भाजपाने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उभे केल्याची घोषणा केली आहे. या घोषणेला दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. मात्र अजूनही तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) याबाबत कुठलीही भूमिका घेतलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीपासूनही तृणमूल काँग्रेस पक्षाला दूर ठेवले. याच बैठकीत माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल मार्गारेट अल्वा यांची उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. २१ जुलै रोजी सर्वपक्षीय खासदारांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रणनीती ठरवतील असे अनेक टीएमसी नेत्यांनी सांगितले, तर विरोधकांनी आरोप केला की तृणमूल काँग्रेस भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी (एनडीए) सामना करण्यास टाळाटाळ करत आहे.
“आमच्या पक्षाच्या प्रमुखांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पुढाकार घेतला कारण भाजपचा पराभव होण्याच्या काही शक्यता होत्या. पण महाराष्ट्रातील घडामोडींनी सर्व समीकरणे बदलली आहे” असे टीएमसी नेते म्हणाले आहेत. “उपराष्ट्रपती निवडणुकीचा निकाल काय लागणार हे माहित आहे. आमच्या पक्षाचे प्रमुख मुत्सद्दी भूमिका घेत आहेत. धनखड उपराष्ट्रपती झाले तर आम्ही आनंदीच आहोत. आम्ही केंद्र सरकारशी प्रत्येक मुद्द्यावर लढू शकत नाही. काहीवेळा, पक्षाने सावकाश धोरण स्वीकारले पाहिजे आणि ते आता तेच करत आहे” अशी भूमिका तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी स्पष्ट केली आहे.
धनकड यांच्या नामांकनावर किंवा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी टीएमसीच्या रणनीतीबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळावी नसली तरी, पक्षाच्या काही नेत्यांनी गुरुवारी राज्यपालांवर टीका केली आहे. ज्येष्ठ खासदार सौगता रॉय म्हणाले “तृणमूल काँग्रेसला विरोध केल्याबद्दलच धनकड यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे.”
आमदार तापस रॉय म्हणाले की “राज्यपाल झाल्यापासून जगदीप धनकड यांनी विविध मुद्द्यांवर राज्य सरकारला विरोध केला आहे. अनेकवेळा आमचा पक्ष आणि सरकारविरोधात ते अशा गोष्टी बोलले आहेत ज्या त्यांनी राज्यपाल म्हणून बोलायला नको होत्या. मला आशा आहे की धनकड यांच्या जागी जो कोणी नवीन राज्यपाल असेल तो आमच्या सरकारला पाठिंबा देईल.”