नागपूर: भारतीय जनता पक्षाने विदर्भातील चार जागांचे उमेदवार जाहीर करताना काहीसा धक्कातंत्राचा वापर केलेला दिसतो. नागपूरमधून गडकरींनाच उमेदवारी मिळणार हे निश्चितच होते, पण त्यांचे नाव उशिरा जाहीर होणे हा गडकरी समर्थकांना धक्काच होता. वर्धेतून रामदास तडस यांच्याऐवजी नवा चेहरा अपेक्षित होता तर चंद्रपूरमध्ये विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची इच्छा नसताना त्यांना उमेदवारी देण्यात आली, अकोल्यात अनुप धोत्रे यांना उमेदवारी देऊन पक्षाने घराणेशाहीला चालना दिली. येथून आ. आकाश फुंडकर इच्छूक होते त्यांच्यासाठी हा धक्का ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपने बुधवारी राज्यातील वीस जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. त्यात विदर्भातील चार जागांचा समावेश आहे. त्यात प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि अकोला या जागांचा समावेश आहे. नागपूरमधून गडकरी यांनाच तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार हे निश्चित होते. पक्षाने पहिल्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट न केल्याने निष्कारण चर्चेला ऊत आला होता. विशेष म्हणजे भाजपकडेही गडकरी वगळता दुसरा उमेदवार नव्हता त्यामुळे गडकरीच लढणार हे स्पष्ट होते. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले.

हेही वाचा : पुण्यात भाजपची हॅटट्रिक ?

वर्धेमध्ये विद्यमान खासदार रामदास तडस यांच्याऐवजी भाजप दुसरा उमेदवार देणार अशी चर्चा होती. खुद्द तडस यांना राज्याच्या राजकारणात रस असल्याने ते विधानसभा निवडणूक लढतील व त्यांच्या जागी कुणबी उमेदवार दिला जाईल, असे बोलले जात होते. नागपूर जिल्ह्यातील एका आमदाराचे नावही यासंदर्भात पुढे आले होते. पण वर्धा जिल्ह्यात तेली समाजाचे वर्चस्व आहे व तडस यांना उमेदवारी नाकारल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल या भीतीने पुन्हा तडस यांना संधी दिली. त्यामुळे तडस यांच्या राज्यात सक्रिय होण्याच्या इच्छेला धक्का बसला आहे.

चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्यास मुनगंटीवार इच्छुक नव्हते. २०१९ मध्ये भाजपचा चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघात धक्कादायक पराभव झाला होता. मागच्या वेळचे पराभूत उमेदवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, अशीच चर्चा होती. पण ऐनवेळी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव पुढे आले. आपण दिल्लीस जाण्यास इच्छूक नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले होते. पण पक्षाने त्यांच्याच नावाची घोषणा करून धक्का दिला आहे.

हेही वाचा : सांगलीत संजयकाका पाटील यांना हॅटट्रिक साधण्याचे मोठे आव्हान

अकोल्यातून अनुप धोत्रे यांचे नाव सुरूवातीला चर्चेत होते, ते माजी मंत्री संजय धोत्रे यांचे पुत्र आहेत. पण खामगावचे विद्यमान आमदार पक्षाचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आकाश फुंडकर हे अकोल्यातून लढण्यास इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळणार असे वाटत असतानाच पक्षाने धोत्रे यांच्यावर विश्वास व्यक्त करून भाजपमध्येही घराणेशाहीला वाव असल्याचे दाखवून दिले. एकूणच जुने आणि नवीन चेहऱ्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.विदर्भात लोकसभेच्या दहा जागा आहेत, त्यापैकी महायुतीत भाजपच्या वाट्याला येणाऱ्या सहापैकी चारच जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले. भंडारा-गोंदिया व गडचिरोलीचे नाव नाही, या जागा भाजपकडे आहे, पण त्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर केले नाही. रामटेकची जागा शिंदे गटाकडे असली तरी तेथे भाजप निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा अद्याप भाजप प्रवेश झाला नाही, ही जागा भाजप लढवू शकते.