परस्परांविरुद्ध लढणारे एकत्र आल्याने विदर्भात पेच; काँग्रेस-शिवसेना रस्सीखेच, इच्छुकांचे यादीकडे डोळे

आतापर्यंत परस्परांविरुद्ध निवडणूक लढणारे काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) हे दोन पक्ष ही निवडणूक एकत्रितपणे लढत असल्याने त्यांच्या पूर्वीच्या जागा सोडण्यास तयार नाही.

vidarbh congress and shivsena
परस्परांविरुद्ध लढणारे एकत्र आल्याने विदर्भात पेच; काँग्रेस-शिवसेना रस्सीखेच, इच्छुकांचे यादीकडे डोळे (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : आतापर्यंत परस्परांविरुद्ध निवडणूक लढणारे काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) हे दोन पक्ष ही निवडणूक एकत्रितपणे लढत असल्याने त्यांच्या पूर्वीच्या जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत विदर्भातील जागा वाटपाचा गुंता सुटण्यास विलंब होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलले आहे. महायुतीमध्ये भाजपसोबत शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि महाविकास आघाडीत काँग्रेस सोबत राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) आहेत. यापूर्वी अनेक मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध सेना अशी लढत झाली आहे. त्यामुळे त्या जागांवर दोन्ही पक्षांचा दावा आहे.

२०१९ मध्ये विदर्भात शिवसेनेने दिग्रस, वरोरा, देवळी, बडनेरा, तिवसा, रिसोड, बाळापूर, मेहकर, सिंदखेड राजा, बुलढाणा आणि ब्रह्मपुरी या जागा लढवल्या होत्या. युतीमध्ये भाजपने रामटेकची जागा लढली होती. या निवडणुकीत काँग्रेसने रामटेकसह शिवसेनेशी वरील सर्व जागांवर दोन हात केले होते. आता शिवसेना काँग्रेससोबत आघाडीत आहे. व त्यांनी पूर्वी लढलेल्या विदर्भातील १२ जागांवर दावा केला आहे. मात्र, महाराष्ट्रात लोकसभेच्या १३ जागा जिकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसला हे मान्य नाही. या पक्षाला विदर्भात मोठ्या विजयाची आशा आहे.

हेही वाचा : विदर्भातील भाजपचा माजी मंत्री राष्ट्रवादीकडून लढणार, विद्यमान आमदाराची अडचण

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने अमरावती, रामटेक आणि कोल्हापूर या तीन जागा काँग्रेससाठी सोडल्याने विधानसभेत अधिक जागा देण्याची विशेषत: विदर्भात अतिरिक्त जागा देण्याची मागणी या पक्षाची आहे. पण काँग्रेसने अधिकच्या तर सोडा ज्या ठिकाणी शिवसेना गेल्या निवडणुकीत पराभूत झाली, त्या जागा देखील सोडण्यास नकार दिला आहे. हा गुंता सोडवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना आणि काँग्रेसने एक पाऊल मागे घेऊन जागा वाटपावर अंतिम तोडगा काढण्याची सूचना शरद पवार यांनी केली. त्यानुसार आता विदर्भातील जागा वाटप केले जाणार असल्याचे समजते. यासंदरभात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जागा वाटपावर अंतिम तोडगा काढला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही वाद मिटेल असा आशावाद माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In vidarbh congress and shivsena uddhav thackeray trouble in distribution of 12 assembly seats print politics news css

First published on: 22-10-2024 at 17:11 IST
Show comments