प्रमोद खडसे
वाशीम : खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात २०२१ मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान वाद उफाळून आला होता. यानंतर ते एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते. परंतु १२ फेब्रुवारी रोजी पोहरादेवीच्या सभेत दोघेही एकमेकांच्या शेजारी बसून चर्चा करीत असतानाची चित्रफीत सार्वत्रिक झाली आणि दोघांमध्ये दिलजमाई झाल्याच्या चर्चेला उधाण आले. राज्यात सत्तांतर होताच दोघांतील वैर संपले का, आगामी निवडणुकांमध्ये ते एकत्र असतील का, त्यांच्या कार्यकर्त्यांचे आपसांत पटेल का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
खा. गवळी आणि आ. पाटणी वाशीम जिल्ह्यातील वजनदार नेतृत्व म्हणून सर्वश्रुत आहेत. आ. पाटणी हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत तर खा. गवळी या बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. एकेकाळी खा. गवळी आणि आ. पाटणी शिवसेनेत एकत्र होते.. मात्र, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि ते एकमेकांचे विरोधक झालेत. त्यानंतर वाशीमच्या जिल्हा नियोजन भवन येथे २६ जानेवारी २०२१ रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान विकास कामातील अडथळ्यांवरून खा. गवळी आणि आ. पाटणी एकमेकांविरोधात उभे ठाकले. दोघांत शिविगाळही झाली होती. त्यानंतर आ. पाटणी यांनी वाशीम पोलीस ठाण्यात खा. गवळी यांनी धमकावल्याची तक्रार दाखल केली होती. दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेदेखील समोरा-समोर आले होते. तेव्हापासून दोघांमधील वाद कायम होता.
हेही वाचा… प्रफुल्ल पटेल-फडणवीसांनी परस्परांवर स्तुतीसुमने उधळल्याने तर्कवितर्क
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करीत ४० आमदार सोबत घेऊन भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. खा. गवळी त्यांच्या समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात दाखल झाल्या. त्यानंतर भव्यदिव्य कार्यक्रम घेऊन खा. गवळी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले. मात्र, जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीला.
हेही वाचा… पंकजा मुंडे यांची नेमकी भूमिका कोणती ?
१२ फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभेच्या व्यासपीठावर आ. पाटणी व खा. गवळी या दोघांच्याही खुर्च्या जवळजवळ होत्या. यावेळी दोघांत चर्चाही रंगली होती. हे पाहता एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दोघेही एकत्र आल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.