वर्धा : पवार कुटुंबात काका पुतण्यात तर वर्धा जिल्ह्यात दोन सख्या भावात फूट पडली आहे. मोठा शरद पवार गटात तर लहाण्याने अजितदादाचा हात धरला. शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार प्रा, सुरेश देशमुख यांचे धाकटे चिरंजीव संदीप देशमुख यांनी शिर्डी अधिवेशनात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. तसेच सहकार नेते व हिंगणघाट बाजार समितीचे अध्यक्ष अँड. सुधीर कोठारी तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शशांक घोडमारे यांनीही प्रवेश केला. त्यामुळे सहकार व पर्यायाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे.
विधानसभा निवडणुकीपासून ही धुसफूस सूरू होती. तेव्हा तिकीट नं मिळाल्याने सुधीर कोठारी यांनी पक्ष सोडून बंडखोर उमेदवार उभा केला होता. पुढे ते सातत्याने अजित पवार यांच्या संपर्कात राहले. नागपूर अधिवेशनात हा प्रवेश होणार होता. पण अखेर शिर्डी अधिवेशनापूर्वी त्यांना अजित पवार यांच्या कार्यालयातून प्रवेश बाबत फोन आला आणि कोठारी तडक शिर्डीस रवाना झाले. तर दुसरीकडे शशांक घोडमारे हे माजी खासदार सुबोध मोहिते यांच्या मार्फत प्रफुल्ल पटेल यांच्या संपर्कात होते. संदीप देशमुख राजकारणात संधी मिळत नसल्याने अस्वस्थ होतेच. चार वर्षांपूर्वी ते अजित पवार यांना घोडमारेसह भेटण्यास पण गेले होते. या एका घटनेने संदीप व समीर या दोन भावात दरीच निर्माण झाली. पुढे वर्धा बाजार समितीत संचालक म्हणून निवडून आलेल्या संदीप देशमुख याचे अध्यक्षपद मात्र हुकले. ते बापूराव देशमुख सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष राहून चुकले असून शिक्षण संस्था पण चालवतात. आपल्या या पक्षप्रवेशास ज्येष्ठ नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे ते म्हणाले. अजितदादा यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात पक्ष बांधणी करून आगामी पंचायत निवडणुका लढवू, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत करीत संधी देण्याची हमी दिली आहे. घोडमारे म्हणाले की, आपण सक्रिय राजकारणात नाहीच. पण जो पक्ष व जे नेते सन्मान देतात त्यांना साथ देण्याची आपली भूमिका असते.
हे ही वाचा… लातुरातून चालणार गोंदिया जिल्ह्याचा कारभार; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व
पक्षाचे जिल्हा सर्वेसर्वा प्रा. देशमुख यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतल्यानंतर समीर देशमुख यांच्या हाती राजकारणाची धुरा आली. समीर देशमुख व शशांक घोडमारे यांचे वितुष्ट जाहीर आहे. या दोघांतील वाद यशवंत शिक्षण संस्थेत गाजला. आता घोडमारे यांनी धाकटे संदीप देशमुख यांची उघड बाजू घेत दिशा स्पष्ट केली. पुढील काळात दोघा भावातील राजकीय वैर काय स्वरूप घेणार याविषयी तर्क वितर्क व्यक्त होवू लागले आहे. कोठारी यांनी अजित पवार यांची पाठराखण करण्याचा निर्णय सहकार गट मजबूत करण्याचा हेतू ठेवून घेतल्याचे म्हटल्या जात आहे.