वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसच्याच आजी माजी नेत्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य लढतीत विद्यमान राष्ट्रवादी कुठेच नसल्याचे चमत्कारीक चित्र पुढे आले आहे. आघाडीच्या जागा वाटपात वर्धा राष्ट्रवादी कॉग्रेसकडे आला. पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या पाठिशी उभे राहणाऱ्या नेत्यांमध्ये वर्धा जिल्हा अव्वल राहला. पक्षाचे सर्वेसर्वा माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, माजी आमदार राजु तिमांडे, सहकारधुरिण सुधीर कोठारी, किशोर माथनकर, अतुल वांदिले ही प्रमुख मंडळी ज्येष्ठ पवारांच्या पाठिशी राहल्याने उमेदवारी या पैकीच एकाला मिळण्याची चर्चा झडली. मात्र या सर्वांच्या आशेवर पाणी फेरून कॉग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे पक्षाचे उमेदवार झाले. कॉग्रेसतर्फेच उभे राहण्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर ते ‘सिल्वर ओक’च्या दिवाणखान्यात विसावले. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीचे तमाम नेते नाराज झाल्याचे चित्र पुढे आले. अमर काळे हे उमेदवार होणार हे जवळपास निश्चित होवूनही घोषणा मात्र होत नव्हती. कारण नाराज नेत्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले. शेवटी या सर्व नाराज नेत्यांना पवारांनी घरी बोलावून चर्चा केली. त्यांची समजूत निघाल्याचे दिसून आल्यावर अमर काळेंना त्याचवेळी पाचारण करण्यात आले. आता राष्ट्रवादीत केवळ दोन दिवसाचे वय असलेल्या काळेंना कधीकाळी राष्ट्रवादीचे दोन वेळा विधान परिषदेचे आमदार राहलेल्या व आता भाजपचे उमेदवार असलेल्या रामदास तडस यांच्याशी लढत द्यावी लागणार.
हेही वाचा : अमरावतीत बच्चू कडूंचा ‘प्रहार’ कुणाला तारक, कुणाला मारक?
अडीच तपापूर्वी दत्ता मेघे यांचे ‘हनुमान’ म्हणून परिचय दिल्या जाणारे तडस हे मेघेंनी पक्ष सोडल्यानंतरही राष्ट्रवादीतच राहले. पवार निष्ठा ठेवली म्हणून त्यांना एस.टी. महामंडळाच्या संचालकपदाची बक्षिसी देण्यात आली, असे हे विद्यमान दाेन प्रमुख उमेदवार राष्ट्रवादीशी नाते सांगतात. आणि मुळात ज्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचा झेंडा फडफडत नव्हे तर किमान टांगता ठेवला, त्यांच्यावर प्रचाराची धुरा पडणार. राष्ट्रवादीत सध्या ‘बाळ’च असणाऱ्या काळेंना हे धुरंधर नाराज नेते कसे यापुढे हाताळणार, हे औत्स्युक्याचे ठरावे. काळेंनी राष्ट्रवादीपेक्षा कॉग्रेसच्याच पंज्यावर लढल्यास होणारी लढत अधिक रंगतदार झाली असती, असा सार्वत्रीक सूर होता. कारण राष्ट्रवादीचे नेते वजनदार असले तरी संघटन मात्र नाममात्रच असल्याचे लपून नाही. सत्तेच्या पहिल्या पायरीवर म्हणजे स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये सुध्दा राष्ट्रवादीला स्थान मिळालेले नाही. दुसरी तेवढीच महत्त्वाची बाब म्हणजे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांची विद्यमान राष्ट्रवादींच्या नेत्यांशी असलेली घसट वर्षभर पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा आजी की माजी नेता निवडणूक गाजविणार, याकडे आता लक्ष लागणार.