दिगंबर शिंदे

माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची विधानपरिषदेची मुदत या महिन्यात समाप्त होत असून त्यांच्या जागी भाजपकडून वर्णी लागावी यासाठी सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे. विधानपरिषदेच्या १० रिक्त जागांसाठी १० जूनपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होत असून यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते इच्छुक असून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून भाजपने इस्लामपूरचे खोत यांना विधान परिषदेचे सदस्य म्हणून संधी दिली. केवळ आमदार पदच दिले असे नाही तर फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्रिपदही देण्यात आले. यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला आळा घातला जाईल असा भाजप नेत्यांचा होरा होता. मात्र, मंत्रिपद व आमदारकी देऊनही खोत यांच्याकडून राजकीय वर्चस्व निर्माण करण्यात यश आले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर खोत यांनी भाजपचा झेंडा हाती न घेता, स्वतंत्र रयत क्रांती संघटनेचा बिल्ला लावला. यामुळे आज भाजपचे मित्र असले तरी त्यांना पुन्हा संधी देण्यास पक्षाचे वरिष्ठ नेते नाखूश असल्याचे दिसत आहे. तसेच शेतकरी नेता असा चेहरा म्हणून ते राजकीय व्यासपीठावर वावरत असले तरी गेल्या चार-पाच वर्षांत त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फारसा आक्रमकपणा दाखवू शकलेले नाहीत. कडकनाथ घोटाळ्यामुळे भाजपला काही प्रमाणात हानी बसली असल्याने त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला जाण्याची शक्यता अधिक वाटत आहे. 

यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून विधान परिषदेसाठी संधी मिळावी यासाठी अनेक नेते प्रयत्नशील आहेत. यामध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, कराडचे अतुल भोसले, पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांची नावे असून इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांचे नाव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शह देण्यासाठीचा चेहरा म्हणून चर्चेत आहे.

इस्लामपूर हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा गड मानला जातो. विरोधकांमधील बेबनाव हेच आतापर्यंतच्या त्यांच्या मताधिक्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये युतीच्या जागा वाटपात इस्लामपूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. सेनेने या ठिकाणी गौरव नायकवडी यांना संधी दिली. तरीही भोसले-पाटील यांनी अपक्ष लढत दिली. त्यांनी युतीचा आदेश डावलून निवडणूक लढवली असली, तरी पक्षाने पुन्हा त्यांना जिल्हा उपाध्यक्षपद देऊन पक्षीय नाते कायम ठेवले आहे. जयंत पाटलांना राजकीय शह देण्यासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. 

तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्षाची बांधणी करण्यामध्ये संघटनमंत्री देशपांडे यांचे मोलाचे योगदान आहे. सांगलीसह, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडून पक्षाचा विस्तार करण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूडची जागा श्रीमती कुलकर्णी यांनी सोडल्याने त्यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो. 

एकीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाची मोर्चेबांधणी सुरू असताना पडद्याआड विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी उमेदवारी अर्ज १० जूनपासून भरण्यात येणार असून २० जूनला मतदान होणार आहे.

Story img Loader