मोहन अटाळकर

पश्चिम विदर्भात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने नवी समीकरणे मांडली असून यावेळी अमरावती विभागातील दोन नेत्यांना संधी देताना जातीय संतुलन साधत नुकसानभरपाईचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून झालेली गच्छंती, त्यामुळे मराठा समाजात निर्माण झालेली नाराजी, राज्यात सत्ता गेल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता, वाढलेली पक्षांतर्गत गटबाजी, या पार्श्वभूमीवर भाजपने पश्चिम विदर्भाकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे.

चार वेळा खासदार राहिलेले संजय धोत्रे यांना २६ महिन्यांमध्येच केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. अंतर्गत राजकारणामुळेच धोत्रे यांना दूर सारण्यात आल्याची चर्चा त्यावेळी रंगली. भाजपने मंत्रिमंडळात मराठा नेते म्हणून धोत्रे यांना संधी दिली होती. धोत्रे यांच्या राजीनाम्यानंतर मराठा समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न म्हणून राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
पश्चिम विदर्भात शिवसेनेचे दोन तर भाजपचा एक खासदार आहे. शिवसेना आता भाजपची शत्रू क्रमांक एक बनली आहे. त्यामुळे सेनेला शह देण्यासाठी भाजपने आक्रमक नेत्यांना पसंती दिली आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने या विभागातील ब्राह्मण चेहऱ्याची निवड केली आहे. भाजपला सातत्याने पाठिंबा देणाऱ्या ब्राह्मण समाजात आपल्याला डावलले जात असल्याची भावना निर्माण होऊ नये, याची दक्षता म्हणून मूळचे अमरावतीकर श्रीकांत भारतीय यांना संधी देण्यात आल्याचे सांगितले जाते.

फडणवीस सरकारच्या काळात मंत्रिपद देताना भाजपने जुन्या-जाणत्या नेत्यांवर अन्याय केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर अंतर्गत गटबाजी उफाळून आली. वेगवेगळ्या गटांमध्ये समेट घडवून आणणे कठीण होत चालल्याचे पक्षाच्या संघटन मंत्र्यांच्याही लक्षात येऊ लागले. केंद्रात सत्ता असूनही त्याचा लाभ मिळू शकत नाही. अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भाजपमधील वरिष्ठांकडून मिळालेला उघड पाठिंबा यामुळेही निष्ठावान कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने भाजपने नवीन रणनीती आखल्याचे दिसून आले आहे.  

गेल्या निवडणुकीत पश्चिम विदर्भात भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यावर भाजपमध्ये चिंतन झाल्यानंतर राजकीय कारणांसह जातीय समीकरणांचाही विचार करण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादीकडे झुकलेल्या कुणबी-मराठा, ओबीसी समाजाला भाजपकडे आकृष्ट करण्याची रणनीती ठरविण्यात आली. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून डॉ. बोंडे यांची राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतला.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षसंघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, हा संदेश देतानाच ब्राह्मण समाजातील नाराजी दूर करण्याचा दुहेरी हेतू श्रीकांत भारतीय यांच्या उमेदवारीतून दिसून आला आहे. पश्चिम विदर्भात आपला जनाधार वाढविताना पारंपारिक मतदारांना एकसंध ठेवण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे.  

Story img Loader