महेश बोकडे
नागपूर : सरकारच्या चुकीच्या निर्णयावर अथवा एखाद्या सामाजिक विषयावर विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहात सांसदीय आयुधांद्वारे सरकारचे लक्ष वेधत असते. तो त्यांचा अधिकारच आहे. हे प्रश्न किंवा समस्या सोडवण्याचे काम सरकार व सत्ताधाऱ्यांचे असते. मात्र नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मात्र विरोधकांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून चक्क सत्ताधारी पक्ष आंदोलन करू लागले आहेत.
विरोधकांच्या खोक्यांच्या घोषणांनी अस्वस्थ सत्ताधारी प्रत्युत्तरादाखल विधान भवनाच्या पायऱ्यांवर नारेबाजी करू लागले आहेत.
विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील चर्चांना काळात महत्व कमी आणि पायऱ्यांवरील आंदोलनाला अधिक असे चित्र प्रत्येक अधिवेशना – दरम्यान दिसून येते. विरोधकांना आंदोलन करण्याचा अधिकारच आहे. त्याला सत्ताधाऱ्यांनी सभागृहात उत्तर देणे अपेक्षित आहे. मात्र नागपुरात अधिवेशनात सलग तिसऱ्या दिवशी सत्ताधारी पक्षाकडूनही आंदोलन करण्यात आले. ते जनतेच्या प्रश्नांवर नव्हते तर विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी होते.
हेही वाचा: भूखंडावरून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यामागे ठाण्यातील राजकारण ?
बुधवारीही सकाळी विरोधी पक्षाने पुन्हा खोक्यांचा मुद्दा उपस्थित केला. ‘पचास खोके, भूखंड ओके’ करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, मुख्यमंत्री राजीनामा द्या, यासह सरकारच्या विरोधात इतरही घोषणा दिल्या. त्याला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी प्रत्युत्तर देत ‘पन्नास आमदार एकदम ओके, घरी बसले माजलेले बोके’,‘वारकरी संप्रदायाचा अपमान करणाऱ्या महाविकास आघाडीचा धिक्कार’ अशा घोषणा दिल्या. आता तर दोन्ही गटात आंदोलनासाठी स्पर्धाच सुरू झाली आहे.
हेही वाचा: केंद्रीय निधीवरून भाजप खासदार-आमदारांमध्येच जुंपली !
रोज नव्या घोषणा आणि त्याला नवा प्रतिवाद सुरू झाला आहे. वास्तिवक सभागृहात सत्ताधारी व विरोधक यांच्यात मुद्यांवरून चकमक उडणे अपेक्षित आहे, मात्र सभागृहाच्या बाहेरही आंदोलनाच्या माध्यमातून चकमकी उडत असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या आंदोलनात प्रवीण दरेकर यांच्यासह, आशीष शेलार, गोपीचंद पडळकर, अतुल भातखळकर, श्वेता महल्ले, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, संजय गायकवाड आदी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते उपस्थित होते.