यवतमाळ – जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात बुधवारी नामांकनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत २०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. महायुती व महाविकास आघाडीत नाराजांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने स्वपक्षातील उमेदवारांसमोर ही बंडखोरी थोपविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

यवतमाळसह वणी, उमरखेड, पुसद, आर्णी या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काही मतदारसंघात नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र बदलू शकते. मात्र यवतमाळ, उमरखेड, आर्णी, वणी या मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान कायम राहण्याची शक्यता आहे. वणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे उमदेवार संजय देरकर यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. संजय खाडे यांच्यासोबत काँग्रेसचा मोठा गट असून शिवसेना उबाठातील नाराजांचीही त्यांना मदत आहे. त्यामुळे संजय देरकर यांना खाडे यांची नाराजी दूर केल्याशिवाय हा गड सर करणे सोपे नाही. येथे शिवसेना उबाठा आणि काँग्रेसही मनाने देरकर यांच्यासोबत नसल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – दिवाळी सणामुळे विधानसभा निवडणूक प्रचाराला खंड

उमरखेड विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. महायुतीत भाजपने विद्यमान आमदार नामदेव ससाणे यांचा पत्ता कट करून नवीन चेहरा असलेले किसन वानखेडे यांना उमेदवारी दिली. येथील माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपने त्यांचा विचार न केल्याने त्यांनी मनसेची उमेदवारी घेत अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीत काँग्रसेने साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे नाराज झाले. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनाच आव्हान देत येथे अपक्ष उमेदवारी दाखल केली. विजय खडसे हे २५ वर्षांपासून येथे राजकारणात सक्रीय आहे. त्यांचा एक मोठा दबावगट मतदारसंघात आहे.

यवतमाळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर यांना मैदानात उतरविले. येथे उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार संदीप बाजोरीया उत्सुक होते. उमेदवारी न मिळाल्याने बाजोरीया यांनी अपक्ष अर्ज दाखल करून काँग्रेसला आव्हान दिले आहे. आपण तुतारी चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचे बाजोरीया सांगत आहेत.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारताच ठाण्यातील बंड शमले

आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांचा पत्ता कट करून राजू तोडसाम यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपमध्येही नाराजी आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे डॉ. विष्णू उकंडे यांनी बंडाचे निशाण फडकवित अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. हा आदिवासीबहुल मतदारसंघ असून डॉ. उकंडे गेल्या पाच वर्षांपासून मतदारसंघात परिश्रम घेत असल्याने त्यांचे आव्हान महायुतीत भारी पडू शकते. भाजपचे नेते हंसराज अहीर यांनी सोमवारी रात्री तोडसाम यांच्या निवासस्थानी भाजपमधील नाराजांशी संवाद साधून समजूत घातली.

पुसद विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार इंद्रनील नाईक यांना घरातून त्यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांनीच अपक्ष उमेदवारी दाखल करत आव्हान दिले आहे. ययाती नाईक महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र ययाती नाईक यांनी कारंजा विधानसभा मतदारसंघातूनही अपक्ष अर्ज दाखल केल्याने ते पुसदची उमेदवारी मागे घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दिग्रस आणि राळेगावमध्ये महायुती व महाविकास आघाडीत उघड बंड झालेले नाही. जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते नाराजांची मनधरणी करत आहेत. त्यांना कितपत यश येते हे आता ४ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.