यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाच्या नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आल्याने ही खेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांची कोंडी करण्याचा उद्देश असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गवळी यांची कोंडी करण्यामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जाऊ लागले.
महायुतीच्या मेळाव्यात भाजप, मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), प्रहार, रिपाईं (आठवले गट) आदी सर्व पक्षाचे नेते, पदाधिकारी सहभागी झाले होते. पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची आग्रही मागणी केली. या मतदारसंघात पुसद, दिग्रस हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ बंजाराबहुल आहेत. यवतमाळ-वाशीम या लोकसभा मतदारसंघातून कुणबी-मराठा समाजाच्या भावना गवळी गेली १५ वर्षे शिवसेनेच्या खासदार आहेत. राज्यात राजकीय समिकरणे बदलल्यानंतर खासदार भावना गवळी या शिवसेना शिंदे गटात सहभागी झाल्या. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी या मतदारसंघात आपल्या उमदेवारीचा दावा केला आहे. मात्र महायुतीच्या मेळाव्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटा)चे आमदार इंद्रनील नाईक यांनी भावना गवळींच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध करीत या मतदारसंघात बंजारा समाजाचा उमदेवार देण्याची मागणी केली आहे. आमदार नाईक यांच्या या मागणीनंतर या मतदारसंघातील उमेदवारी भाजप व मित्रपक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत.
हेही वाचा : डोंबिवलीतील अस्वस्थ नेत्यांचा भाजपला रामराम, राजाश्रयासाठी शिंदे अधिक सोयीचे
मुळात आमदार इंद्रनील नाईक यांनी ही मागणी बंजारा समाजातील इतर व्यक्तीसाठी केली नसून स्वत:च्या घरातील व्यक्तीसाठी केल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुसद आणि परिसरात आ. इंद्रनील नाईक यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सहचारिणी मोहिनी इंद्रनील नाईक या विविध सामाजिक आणि इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे आ. इंद्रनील नाईक यांच्या या खेळीमागे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घरातच पदरात पाडून घेण्याची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. मात्र या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा आहे. त्यामुळे शिंदे गट हा मतदारसंघ सोडण्याची शक्यता नाही. इंद्रनील नाईक राष्ट्रवादीचे आहे. परंतू, राष्ट्रवादी (अजित पवार) येथे दावा सांगण्याची शक्यता कमीच आहे.
हेही वाचा : भाजपला रोखण्याचे आव्हान, महाविकास आघाडीत वादच सुरू
अलिकडे खा. भावना गवळी यांची विविध पद्धतीने कोंडी करून भाजप दबावाचे राजकारण करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भावना गवळींना येथे उमेदवारी नाकारून भाजप ही जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी आटापीटा करत असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच आ. इंद्रनील नाईक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाने या मतदारसंघात बंजारा चेहरा देण्याची मागणी पुढे केल्याची चर्चा आहे. आ. इंद्रनील नाईक यांच्या सहचारिणी मोहिनी नाईक यांचे थेट गुजरात कनेक्शन आहे. मोहिनी नाईक यांचे वडील हे गुजरातचे माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. त्यांचे आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांचे घनिष्ठ संबंध या मागणीमागे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपने येथे महिला आणि बंजारा उमेदवार देण्याची ही खेळी खेळली तर मोहिनी इंद्रनील नाईक या भाजपकडून लोकसभेच्या उमेदवार राहू शकतात, असे सांगितले जात आहे. महायुतीने बंजारा, मराठा, समाजासोबच ओबीसी चेहऱ्याचीही चाचपणी सुरू केली आहे. मात्र सध्यातरी भाजपकडे या मतदारसंघात छाप पडेल असा ओबीसी चेहरा नाही. त्यामुळे बंजारा समाजाचा उमेदवार हीच महायुतीची पसंती असू शकते, असे बोलले जात आहे.
मेरी झांसी नहीं दुंगी…
भाजपकडून होत असलेली धोका ओळखून खा. भावना गवळी यांनी महायुतीच्या मेळाव्यात ‘मेरी झांसी नहीं दुंगी’ म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या वाटेला गेलात तर लोकसभा उमेदवारीच्या मार्गात आडवे येणाऱ्यांच्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा इशारा गवळी यांनी दिल्यानंतर पुसद, दिग्रस मतदारसंघातील बंजारा नेत्यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे.