मुंबई : जनता, कार्यकर्ते यांच्याशी किंवा लोकप्रतिनिधी या नात्याने केलेले अयोग्य वर्तन आणि पुरेसा जनसंपर्क नसणे, हे मुंबईतील तीनही खासदारांना भोवले आहे. लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून आर्थिक गैर व्यवहार किंवा अन्य चुकीच्या गोष्टी होत असल्याच्या तक्रारी आल्यास त्याही खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा सूचक इशाराच पक्षश्रेष्ठींनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेसाठी दोन वेळा निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी देताना त्यांची कामगिरी, त्यांच्यासंदर्भातील कार्यकर्ते व जनतेच्या तक्रारी, पुन्हा निवडून येण्याची खात्री, आदींबाबत कठोरपणे विचार करून आणि सर्वेक्षण करून निर्णय घेतला जाईल, असे पक्षश्रेष्ठींनी काही महिन्यांपूर्वीच पक्षांतर्गत बैठकांमध्ये स्पष्ट केले होते. गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सर्वेक्षणाचा पहिला अहवाल आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश यांनी राज्यातील प्रत्येक खासदाराशी सविस्तर चर्चा केली होती. ज्या खासदारांच्या कामगिरीबद्दल सर्वेक्षणाचे अहवाल नकारात्मक होते, ज्यांच्याविषयी जनता व कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या, त्यांना तंबी देवून सुधारणेसाठी डिसेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता.

हेही वाचा…काँग्रेसविरोधात भाजपाचा खोटा प्रचार केवळ भीतीपोटी; सचिन पायलट यांचा हल्लाबोल

भाजपने दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करताना उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी व ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांची तिकीटे कापून अनुक्रमे केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि आमदार मिहीर कोटेचा यांना भाजपने उमेदवारी दिली. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीस शिवसेनेने २०१९ मध्ये तीव्र विरोध केल्याने कोटक यांना अचानकपणे उमेदवारी मिळाली होती. पण काही आर्थिक व्यवहार, व्यावसायिकांशी संबंध, कार्यकर्त्यांशी वर्तनाबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यांचा पुरेसा जनसंपर्क नव्हता. शेट्टी यांच्यासंदर्भातही अशाच स्वरूपाच्या तक्रारी होत्या. शेट्टी यांच्याकडे अनेक नागरिक विविध प्रश्न घेऊन जात होते व ते मदतही करीत होते. पण काही नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते नीट बोलत नसल्याच्या तक्रारी होत्या.

महाजन यांचा जनतेशी व कार्यकर्त्यांशी फारसा संपर्क नव्हता. त्या उद्धटपणे वागतात, उपलब्ध होत नाहीत, दूरध्वनीही घेत नाहीत, अशी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची तक्रार होती. प्रदेश पातळीवरील बैठका व कार्यक्रमांसाठीही त्या गैरहजर रहात होत्या. त्यांच्या स्वीय सहाय्यकांबाबतही काही तक्रारी होत्या. तीनही खासदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता किती आहे, याबाबत सर्वेक्षणात आढावा घेण्यात आला होता. शेट्टी हे गेल्या निवडणुकीत चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते. ते निवडून येण्यात फारशी अडचण नसली तक्रारी आणि गोयल यांना सुरक्षित मतदारसंघ देण्यासाठी शेट्टी यांना उमेदवारी नाकारली गेली. शेट्टी यांच्याइतके मताधिक्य राखण्याचे मोठे आव्हान गोयल यांच्यापुढे आहे. कोटक यांना गेल्यावेळी लोकसभेची लॉटरी लागली होती. त्यांचे तिकीट कापले गेले असले, तरी सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळू शकते. महाजन यांना पक्षांतर्गत विरोधाचा फटका बसला. काही प्रदेश नेत्यांनी त्यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींपर्यंत तक्रारी नेल्याने त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही.

हेही वाचा…प्रमोद महाजन हत्या ते २६/११ चा खटला, उज्ज्वल निकम राजकारणात कसे आले?

एक-दोन वेळा खासदारकी मिळाली असली, तरी तक्रारी आल्यास आणि पुरेसा जनसंपर्क नसल्यास तिकीट कापले जाऊ शकेल, असा सूचक इशारा पक्षश्रेष्ठींनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही भाजप नेत्यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणुका लढविल्या जात असल्याने खासदार-आमदार मातब्बर असले, तरीही त्यांना उमेदवारी नाकारली जाऊ शकते, असाच संदेश पक्षनेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inadequate public relations and misconduct to office bearers lead to cut the ticket of mumbai bjp members of parliament print politics news psg
Show comments