Delhi Election Results 2025 Vote Counting Updates : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. भाजपाने बहुमताच्या दिशेने मुसंडी मारली असून आम आदमी पक्षाचा लाजिरवाणा पराभव होतोय. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून भाजपाला ४० ते ४२ जागा मिळण्याची शक्यता असून आम आदमी पक्ष २८ ते ३० जागांवर राहण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसही एकही खातं अद्याप उघडता आलेलं नाही. म्हणजे, दिल्लीत काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याची चिन्ह आहेत. दरम्यान, भाजपा आणि आपच्या जागांमध्ये फरक असला तरीही दोघांच्या मतटक्केवारीत फक्त ३ टक्क्यांचा फरक आहे. हा ३ टक्क्यांचा फरक म्हणजे मध्यमवर्गीयांनी हा खेळ पालटल्याचा दावा राजकीय विश्लेषक यशवंत देशमुख यांनी म्हटलंय. ते इंडिया टीव्हीबरोबर बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार, भाजपा ४५ जागांवर तर आम आदमी पक्ष २८ जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजपाला ४७.१९ टक्के मते मिळाली असून आपला ४३ टक्के मते मिळाली आहेत. म्हणजेच दोन्ही पक्षांमध्ये फक्त तीन टक्क्यांचाच फरक आहे. दोन महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे हा फरक कमी असल्याचा तर्क यशवंत देशमुख यांनी मांडला आहे.

यशवंत देशमुख म्हणाले, “सकाळपासून दोन नंबरवर असलेले उमेदवार फक्त ५०० ते १०० फरकांनी मागे आहेत. एक मशिन सुरू केली की त्यामध्ये १००० मते या पक्षाला आणि १००० मते दुसऱ्या पक्षाकडे जात आहेत. आप आणि भाजपाच्या मतटक्केवारीत फक्त ३ टक्क्यांचा फरक आहे. भाजपाला ४७ तर आप ४३ टक्के मते आहेत. आम आदमी पक्षाने मध्यमवर्गीयांना गमावलं आहे आणि भाजपाने त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतलंय. शीष महल आणि मद्य धोरण घोटाळ्यामुळे आपने विश्वासार्हता गमावली. तसंच यूनियन बजेटमुळे हा मध्यमवर्गीय भाजपाकडे वळला.”

आजच्या निकालात निर्मला सीतारमण यांचा चार टक्के वाटा

केंद्रीय अर्थसंकल्पात १२ लाखांचं उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला करमुक्त केल्याचा दिल्ली निवडणुकीवर काय परिणाम झाला असा प्रश्न विचारला असता यशवंत देशमुख म्हणाले, सध्याचे जे निकाल समोर येत आहेत, त्यात निर्मला सीतारमण यांचा ४ टक्के वाटा आहे. अर्थसंकल्पानंतर बहुतेक मध्यमवर्ग भाजपाकडे वळला असावा”, असं ते म्हणाले.

मतदानोत्तर चाचणीत उत्पन्नानुसार मतदारांच्या टक्केवारीत खूप फरक आहे. ही वर्गवारी केली तरच आपचा पराभव का झाला हे समजू शकता येईल, असंही त्यांनी पुढे म्हटलंय.