मुंबई : महाविकास आघाडीकडून ईव्हीएमविरोधात मोहीम उघडण्यात आली असून यासंदर्भात शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) सादरीकरण करण्यात आले. मतदानाच्या दिवशी शेवटच्या दोन तासांत वाढलेले मतदान संशयास्पद असून टपालातील मते आणि मतदान यंत्रातील मतांमध्ये मोठी तफावत आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीतूनच हे स्पष्ट होत असून याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण करावे, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे) आमदार वरुण सरदेसाई यांनी सादरीकरण करीत आकडेवारी मांडली.
हेही वाचा >>> ‘ठाकूर’शाही संपवण्यासाठी दुबे प्रकरणाचा वापर; विधानसभेतील विजयानंतर आता पालिकेच्या नियंत्रणासाठी भाजपची व्यूहरचना
वरुण सरदेसाई यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत सादरीकरण केले. देशाचे संरक्षण करणारे सैनिक, वयोवृद्ध व्यक्ती, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, शासकीय कर्मचारी हे टपाली मतदान करतात. त्यामुळे ही मते म्हणजे त्या त्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. लोकसभेची आकडेवारी पाहिली तर पोस्टल मतांमध्ये मविआ ३१ जागांवर तर महायुती १६ जागांवर आघाडीवर होती, मतदान यंत्रातील मतांमध्येही सुरुवातीला हीच आकडेवारी होती. लोकसभेला हे आकडे तंतोतंत जुळले, पण विधानसभा निवडणुकीत टपाली मतदानात महाविकास आघाडी १४३ आणि महायुती १४० जागा आणि इतर ५ जागांवर आघाडीवर आहे. पण मतदान यंत्रातील निकाल आल्यानंतर महाविकास आघाडी ४६, महायुती २३० जागा आणि इतर १२ जागांवर पोहोचले. एवढी मोठी तफावत कशी होऊ शकते, असा प्रश्न यावेळी सरदेसाई यांनी उपस्थित केला.
यावेळी काही मतदारसंघांचे उदाहरण देताना सरदेसाई यांनी वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे यांना टपाली मतदान ८७४ तर मतदान यंत्रात ६२,४५० मते मिळाली. मिलिंद देवरा यांना टपाली ५२२ मते, मतदान यंत्रात ५४,००१ मते मिळाली, असे सांगितले. पोस्टल मतांमध्ये अनेक मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे असते आणि मतदानयंत्राच्या मतमोजणीत मागे जातो. ही इतकी तफावत कशी असू शकते, असे ते म्हणाले.
‘लोकसभेतील चित्र विधानसभेत का नाही?’
निवडणूक आयोगाचे काम निवडणूक घेणे आहे. आमच्या मनात शंका असेल तर त्याचे निरसन करण्याचे काम आयोगाचे आहे. लोकसभा निवडणुकीत जो ट्रेंड होता, तो विधानसभेला कसा बदलला? जर भारताचे सैनिक, वयोवृद्ध, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, शासकीय कर्मचारी पोस्टल बॅलेटवर मतदान करतात. ईव्हीएममध्ये जे काही घोळ आहेत, ते वेगवेगळ्या नेत्यांनी मांडले आहेत. प्रत्येक जागेवर मविआ उमेदवारांची पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमध्ये ५ ते १५ टक्क्यांची घट दिसते आणि महायुती उमेदवारांच्या मतांमध्ये ५ ते १५ टक्के मते वाढतात हे कशी..? अशी शंका त्यांनी उपस्थित केली.