ठाणे : मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण देताना कुणबी नोंदीचा मुद्दा सातत्याने पुढे आल्याने गेल्या वर्षभरापासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या कुणबी समाजात तीव्र पडसाद उमटत असल्याचे चित्र आहे. मनोज जरांगे यांच्या जशी धार चढू लागली तशी भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड भागात लाखोंच्या संख्येने असलेला कुणबी समाजही रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाला. लोकसभा निवडणुकांचा प्रचार ऐन भरात असताना कुणबी समाजातील ही अस्वस्थता आता या मतदारसंघात दबक्या सुरात का होईना व्यक्त होऊ लागल्याने तिरंगी लढतीमुळे सुरुवातीला आश्वस्त असलेल्या भाजपच्या गोटातही चिंतेचे मळभ दाटू लागले आहे.
भिवंडी लोकसभेसाठी भाजपचे केंद्रीय राज्य मंत्री कपील पाटील हे सलग तिसऱ्यांदा निवडणुक रिंगणात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वादात या जागेचा तिढा अखेरपर्यत कायम होता. भाजपने महाराष्ट्रातील पहिल्याच यादीत कपील पाटील यांचे नाव भिवंडीतून जाहीर केले. त्यामुळे मतदारसंघात मोठी नाराजी असतानाही ते जोमाने कामाला लागले. मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे आणि पाटील यांच्यात विस्तवही जात नाही. पाच वर्षांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कथोरेंनी पाटील यांच्या विजयासाठी जंगजंग पछाडले. त्यांचे मुरबाड मतदारसंघात पाटील यांना ६० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून दिले. मात्र कुणबी समाजातील कथोरेंना पाटील यांनी पाच वर्षात दुखाविण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे कथोरे समर्थकांमध्ये पाटील यांच्याविषयी टोकाची नाराजी आहे. या मतदारसंघात आगरी-कुणबी असा संघर्षही यापुर्वी दिसून आला आहे. आगरी समाजातील पाटील कुणबी कथोरेंना योग्य वागणूक देत नाहीत अशी सुप्त नाराजीही या समाजात दिसत होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कथोरेंची समजूत काढत सध्यातरी त्यांना पाटील यांच्या प्रचारात सक्रिय केले आहे. पाटील यांना पाठींबा देण्यासाठी कथोरेंनी एक पत्रही प्रसिद्ध केले आहे. असे असले तरी कुणबी समाजाची नाराजी दूर करणे पाटील यांना शक्य झालय का याविषयी मात्र मतदारसंघात वेगवेगळे मतप्रवाह आहेत.
हेही वाचा : रायबरेलीत प्रचार करताना प्रियांका गांधी का काढत आहेत १९२१ च्या हत्याकांडाची आठवण?
निलेश सांबरेच्या उमेदवारीनंतरही चुरस कायम
या मतदारसंघात निलेश सांबरे या कुणबी समाजातील नेत्याने अपक्ष अर्ज दाखल केल्याने कपील पाटील यांना ही निवडणुक सोपी झाल्याची चर्चा सुरुवातीला होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा हेदेखील आगरी समाजातील आहेत. या मतदारसंघात पाच वर्षांपुर्वी भिंवडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात कपील पाटील यांना ५० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. येथे आगरी समाज आणि मुरबाड, शहापूर पट्टयातील कुणबी समाजही पाटील यांच्यासोबत राहील्याचे तेव्हा चित्र होते. यावेळी मराठा आंदोलनानंतर शहापूर तसेच आसपासच्या भागातील कुणबी समाजही आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते. सांबरे यांचे या भागात मोठे काम असल्याने मतदारसंघात सात लाखांहून अधिक संख्येने असलेला कुणबी समाज त्यांच्यामागे उभा राहील अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे. हे मतविभाजन पाटील यांच्या पथ्यावर पडेल अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त होत होती. प्रत्यक्षात मात्र शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण या भागातील हक्कांच्या मतांवर पाणी सोडावे लागेल अशी भीती आता पाटील यांच्या गोटात व्यक्त होऊ लागली आहे. कुणबी समाजातील मतटक्क्यामुळे मागील निवडणुकीत कपील पाटील यांचा विजय सुकर झाला होता. यावेळी मात्र हा मतदार भाजपसोबत राहील का अशी भीती या पक्षाच्या नेत्यांना आहे. उघडपणे याविषयी कुणीही बोलत नसले तरी दबक्या सुरात मात्र ही चर्चा मतदारसंघात जोरात आहे.
हेही वाचा : भाजपाला समर्थन देणारे आणखी १० आमदार काँग्रेसच्या संपर्कात? हरियाणाचे माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?
ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी विरोध केला होता. त्यावेळेस महाविकास आघाडीचे नेते आणि अपक्ष उमेदवार गप्प होते. ठाणे आणि पालघर जिल्हयात पेसा कायदा लागू झाला आणि वन, शिक्षक, तलाठी भरतीत मराठ्यांना आरक्षण दिले गेले. त्यास कुणबी सेनेने विरोध करून स्थगिती आणली. शेतकरी आणि समाजाच्या भल्यासाठी आम्ही महायुतीला साथ दिली आहे.
विवेक पाटील, सरचटणीस, कुणबी सेना