मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती: मोर्शीचे माजी आमदारद्वय हर्षवर्धन देशमुख आणि नरेशचंद्र ठाकरे यांच्‍यातील राजकीय संघर्षाची चुणूक श्री शिवाजी शिक्षण संस्‍थेच्‍या निवडणुकीत दिसून आली, पण आता राष्‍ट्रवादीच्‍या वाटेवर असलेल्‍या आमदार देवेंद्र भुयार यांनी थेट ठाकरेंनाच ‘हात छाटण्‍याचा’ धमकीवजा इशारा दिल्‍याने हा संघर्ष वेगळ्याच वळणावर पोहचला आहे.

‘निवडणूक आली की देशमुख विरूद्ध पाटील असा सामना रंगवला जातो. जातीचे विष पेरले जाते. मुंबईच्‍या ठाकरेंची दहशत काल, आज आणि उद्याही असेल, तुमची दहशत नदीच्‍या काठापर्यंत आहे. आमच्‍या नादाला लागायचे नाही. शिवाजी शिक्षण संस्‍थेच्‍या निवडणुकीत जाणीवपूर्वक धक्‍काबुक्‍की केली, पण याद राखा. यानंतर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या कुठल्‍याही कार्यकर्त्‍याला धक्‍का लावला तर तलवारीने हात छाटल्‍याशिवाय राहणार नाही. जुना देवेंद्र भुयार अंगात आणला तर तुमची पाटीलकी काढल्‍याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी विरोधकांना दिला, आणि मंचावरील नेतेही अवाक् झाले.

हेही वाचा : महाराष्ट्रात खरगे काय करतील ?

वरूड येथे राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्‍यात देवेंद्र भुयार यांनी हे वक्‍तव्‍य केले असले, तरी त्‍याला संदर्भ शिवाजी शिक्षण संस्‍थेच्‍या निवडणुकीचा आहे. या निवडणुकीत संस्‍थेचे अध्‍यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि माजी उपाध्‍यक्ष नरेशचंद्र ठाकरे यांच्‍या पॅनेलमध्‍ये लढत झाली. देशमुख यांच्‍या पॅनेलने वर्चस्‍व प्रस्‍थापित केले. त्‍याआधी मतदानादरम्‍यान देवेंद्र भुयार आणि नरेशचंद्र ठाकरे यांच्‍या गटातील कार्यकर्त्‍यांमध्‍ये धक्‍काबुक्‍की झाली होती. त्‍यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला होता.

हेही वाचा : अजित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात सोसायटीधारकांच्या ‘मतपेढी’साठी रस्सीखेच सुरू

देवेंद्र भुयार हे हर्षवर्धन देशमुख यांचे कडवे समर्थक आहेत. त्‍यांची शैली आक्रमक आहे. स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्‍या झेंड्यावर त्‍यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. पक्षविरोधी भूमिका घेतल्‍याचा ठपका ठेवून त्‍यांना स्‍वाभिमानी पक्षातून काढून टाकण्‍यात आले. त्‍यामुळे अनेक कार्यकर्ते भुयार यांच्‍यापासून दुरावले. त्‍याची नुकसानभरपाई करण्‍यासाठी भुयार यांनी राष्‍ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
भुयार यांनी धमकी दिल्‍याबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी समाजमाध्‍यमावर प्रतिक्रिया देताना भुयार यांना आव्‍हान दिले. ‘हर्षवर्धन देशमुख आमच्‍यासाठी पितृतुल्‍य आहेत. त्‍यांचा आम्‍ही नेहमी आदरच केला आहे. पण भुयार यांनी अशा स्‍वरूपाची धमकी देऊन गुन्‍हेगारी वृत्‍ती दाखवून दिली. आता जुना देवेंद्र भुयार होऊनच दाखव, आम्‍हीही बघतो.’ अशा शब्‍दात विक्रम ठाकरे यांनी प्रतिआव्‍हान दिल्‍याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : नागपूर ते गोवा केवळ ८-१० तासांत? ‘शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग’ कसा आहे?

मोर्शी-वरूड हे तालुके संत्री बागांसाठी प्रसिद्ध आहेत. पण, राजकारण मात्र कटु होत चालले आहे. मोर्शी मतदार संघात एका आमदाराला सलग दुसऱ्यांदा विजय मिळणे दुर्मिळच. भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे हे कृषीमंत्री असूनही त्‍यांना पराभवाचा धक्‍का सहन करावा लागला होता. आता ते राज्‍यसभा सदस्‍य बनले आहेत. त्‍यांच्‍या समोर आता नवे राजकीय विरोधक असतील. त्‍यांना लढत देण्‍याचे आव्‍हान देवेंद्र भुयार यांच्‍यापुढे असणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent mla devendra bhuyar warns thackeray ncp amaravati print politics news tmb 01
Show comments