Ravindra Bhati : राजस्थानमधील शियो या मतदार संघाचे अपक्ष आमदार रवींद्र भाटी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या मतदारसंघातला साडेआठ हजार कोटींचा अक्षय उर्जा प्रकल्प रखडण्यासाठी रवींद्र भाटी जबाबदार असल्याचा आरोप कंपन्यांच्या संघटनांनी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. रवींद्र भाटी हे राजस्थान सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत. राजस्थान भाजपाचे अध्यक्ष मदन राठोड यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. बाडमेर जिल्ह्यात विकास कामात भाटी अडथळे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘चुट्टा सांड’ असं म्हणत राठोड यांनी भाटी यांच्यावर टीका केली आहे. रवींद्र भाटी हे पूर्वी भाजपा आणि अभाविपची संबंधित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीपासूनच रवींद्र भाटी चर्चेत

डिसेंबर २०२३ मध्ये राजस्थान विधानसभेची निवडणूक पार पडली. तेव्हापासूनच रवींद्र भाटी चर्चेत आहेत. रवींद्र भाटी हे या मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आले आहेत. मात्र स्थानिक प्रशासन, खासगी कंपन्या, पोलीस यांच्याशी झालेल्या वादांमुळे ते कायमच चर्चेत राहिले आहेत. शियो पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मगन खान यांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र भाटी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र भाटी यांनी मात्र सोमवारी जी पत्रकार परिषद घेतली त्यात हे सांगितलं की त्यांच्याविरोधात जे गुन्हे दाखल झाले आहेत ते लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहेत. भाटी लोकांचे प्रश्न उचलून धरत असल्याने लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढते आहे. मागच्या वर्षभरात त्यांनी बाडमेर तुरुंगात झालेल्या कैद्यांच्या मृत्यूचा निषेध नोंदवणं, स्थानिकांना खासगी कंपन्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करणं, पाणी टंचाई, बेरोजगारी, वीज कपात या मुद्द्यांवर ते प्रशासनाशी भांडत आहेत. त्यामुळे प्रशासनाचा रोष त्यांच्यावर असला तरीही लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे.

लोकांमध्ये का वाढली रवींद्र भाटींची लोकप्रियता?

रवींद्र भाटी यांनी १९६५ च्या युद्धात मृत्यू झालेल्या रेल्वे कामगारांची माहिती देणारं संग्रहालय उभारा अशी मागणी राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना केली होती. तसंच ८० ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी हरिद्वारला तीर्थयात्रा घडवून आणली. तसंच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलही त्यांनी आयोजित केली होती. मोफत फिजिओथेरेपी शिबीरांचं आयोजनही त्यांनी केलं होतं. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची प्रसिद्धी वाढते आहे. मागच्या काही महिन्यांपासून रवींद्र भाटी यांची आंदोलनं वाढली आहेत. ओरान अर्थात जी झाडं पवित्र मानली जातात त्यांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच सौर कंपन्यांचा त्यांनी जोरदार निषेध नोंदवला आहे. बाडमेर हा राजस्थानातला सीमाभागातला जिल्हा आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत इथे होणाऱ्या एका रोहिडी म्युझिक फेस्टिव्हललाही जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी अलिकडेच परवानगी नाकारली होती. त्याचाही निषेध नोंदवण्यात आला.

भाजपाशी संबंध सुरुवातीला चांगले आणि आता संघर्षाचे

रवींद्र भाटी हे विद्यार्थी संघटनेत असल्यापासून भाजपाशी जोडले गेले होते. सुरुवातीला अभाविप आणि नंतर भाजपाशी त्यांचे चांगले संबंध होते. मात्र शीयोमधून तिकिट नाकारलं गेल्याने ते अपक्ष लढले आणि निवडून आले. भाजपाचे त्यांचे संबंध हे संघर्षाचेच राहिले आहेत असं दिसून येतं आहे. त्यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे. तसंच ते उचलून धरत असलेल्या प्रश्नांमुळे सरकार कधी कधी अडचणींत सापडतं आहे तर लोकांमध्ये भाटी लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे सध्या तरी ते भजनलाल शर्मा सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत यात शंका नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent mla who is pain in rajasthan govt neck who is ravindra bhati scj