आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक इंडिया आघाडीच्या रूपात एकत्र आले आहेत. या आघाडीच्या काही महिन्यांत अनेक बैठका झाल्या. या बैठकांत एकत्र येण्यासाठीचा अजेंडा, किमान समान कार्यक्रम, तसेच वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आघाडीत एकूण २८ पक्षांचा समावेश आहे. दरम्यान, आघाडीला मूर्त स्वरूप येऊन अनेक महिने लोटले असले तरी जागावाटपाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे जागावाटपाचा मुद्दा प्रलंबित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया आघाडीतील जागावाटप जैसे थे!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी १४ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक झाली होती. या बैठकीत जागावाटपावर चर्चा कशी सुरू करायची? त्यासाठीची दिशा काय असेल? या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांत जागावाटप करणे तुलनेने अवघड आहे. कारण- आघाडीत एकत्र असलेले पक्ष या राज्यांत एकमेकांचे टोकाचे विरोधक आहेत. या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाली होती. पुढे देश पातळीवर जागावाटपाचे समान सूत्र नसेल, असे या बैठकीत ठरवण्यात आले. म्हणजेच त्या-त्या राज्यातील परिस्थितीनुसार जागावाटपाचा निर्णय घेण्यावर या बैठकीवर एकमत झाले.

मध्य प्रदेशसाठी काँग्रेस-समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावर चर्चा

सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. इंडिया आघाडीतील समाजवादी पार्टी मध्य प्रदेशची निवडणूक लढवणार आहे. सध्या काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू झाली आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेस पक्षाचे नेते दिल्लीशी याबाबत चर्चा करीत आहेत. याच जागावाटपावर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली. “मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी स्वबळावर एकही जागा जिंकू शकत नाही. असे असले तरी दिल्लीमधून जो आदेश येईल, त्याचे आम्ही पालन करू,” अशी प्रतिक्रिया या नेत्याने दिली.

समाजवादी पार्टीने उमेदवार केले जाहीर

दरम्यान, मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने काही जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. सिंगरौली जिल्ह्यातील धौहानी व सिधी, भिंड जिल्ह्यातील मेहगाव, भांदेर, निवारी, छत्रपूर जिल्ह्यातील राजनगर, रेवा जिल्ह्यातील सिरमौर या मतदारसंघांसाठी समाजवादी पार्टीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. या सात मतदारसंघांपैकी काँग्रेसने २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत तीन जागांवर विजय मिळवला होता. जाहीर केलेल्या मतदारसंघांसाठी समाजवादी पार्टीने प्रचारदेखील सुरू केला आहे.

अखिलेश यादव आणि काँग्रेस यांच्यात चर्चा

समाजवादी पार्टीने सात जागांवर उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसला फटका बसू शकतो. याच कारणामुळे मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात चर्चा सुरू आहे. अगोदर समाजवादी पार्टीच्या दोन वरिष्ठ नेत्यांशी काँग्रेसचे बोलणे सुरू होते. आता मात्र समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांची थेट काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा सुरू आहे.

सपाला जनाधार नसल्याचा काँग्रेसचा दावा

याच जागावाटपावर समाजवादी पार्टीच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली. “मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि सपा यांच्यात युती झाली, तर आम्हाला काही मतदारसंघांतील उमेदवार बदलावे लागतील. कारण- काही मतदारसंघांत आम्हाला जनाधार नाही, असे स्थानिक काँग्रेसचे मत आहे. त्यामुळे २०१८ सालच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघांत आमचा पराभव झालेला आहे, त्या जागा आम्हाला कदाचित सोडाव्या लागतील,” असे या नेत्याने सांगितले.

आप, डावे पक्षही निवडणुकीच्या मैदानात

इंडिया आघाडीतील आम आदमी पार्टी (आप) हा पक्षदेखील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवत आहे. डावे पक्षदेखील या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळेही काँग्रेसला मिळणाऱ्या मतांचे विभाजन होऊ शकते. त्यावर काँग्रेसच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली. “आमची सध्या फक्त समाजवादी पार्टीशी जागावाटपाबाबत बोलणी सुरू आहेत. आप आणि डाव्या पक्षांना मध्य प्रदेशमध्ये जनाधार नाही. त्यामुळे आम्ही हायकमांडच्या निर्देशाची वाट पाहत आहोत,” असे हा नेता म्हणाला.

विरोधकांच्या सभांचे काय झाले?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता, इंडिया आघाडीतील पक्षांनी देशाच्या वेगवेगळ्या भागांत संयुक्त सभा घेण्याचे ठरवले होते. मात्र, अद्याप तशी एकही सभा झालेली नाही. जागावाटपासोबतच संयुक्त सभांच्या मुद्द्यावरही अद्याप काही ठोस निर्णय झालेला नाही. इंडिया आघाडीतील प्रमुख समजला जाणारा काँग्रेस हा पक्ष सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत गुंतला आहे. इंडिया आघाडीची पहिली संयुक्त सभा भोपाळमध्ये होणार होती. मात्र, सध्या मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू असल्यामुळे काँग्रेसने या सभेची तयारी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. आम्ही सध्या निवडणुकीत व्यग्र आहोत, असे मध्य प्रदेशच्या काँग्रेसने सांगितले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India alliance discussion on seat sharing is on hold due to five state assembly elections prd
Show comments