तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील टीकेनंतर आठवड्याभरापासून देशभरात वादंग निर्माण झाले आहे. त्यानंतर उदयनिधी ज्या कार्यक्रमात सनातन धर्मावर विधान केले होते, त्याच कार्यक्रमात द्रमुकच्या आणखी एका नेत्याने केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. तमिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के. पोनमुडी यांच्या विधानावरून भाजपाने इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे.
२ सप्टेंबर रोजी तमिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनच्या एका कार्यक्रमात उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म हद्दपार करण्याबाबतचे वक्तव्य केले होते. याच कार्यक्रमात पोनमुडी म्हणाले, “आमच्यामध्ये अनेक मतभेद असले तरी सनातनचा विरोध करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येतो. समता प्रस्थापित करणे, अल्पसंख्याकांना सुरक्षा प्रदान करणे आणि लिंग समानता आणण्यासाठी इंडिया आघाडीतील प्रत्येकजण सनातन धर्माच्या विरोधात आहे. हाच इंडियातील २६ पक्षांचा मुख्य उद्देश आहे.”
हे वाचा >> सनातन धर्म म्हणजे काय? उत्पत्ती आणि ऐतिहासिक संदर्भ काय आहे?
उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म हद्दपार करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपाने जोरदार आक्षेप घेतला असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्र्यांना आवाहन करून या विधानाचा जोरदार प्रतिकार करावा, असे निर्देश दिले. पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे नेते एमके स्टॅलिन यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मंगळवारी (दि. १२ सप्टेंबर) भाजपाचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. भाजपाकडून पोस्ट करण्यात आलेला पोनमुडी यांच्या भाषणाचा व्हिडिओ अन्नामलाई यांनी आपल्या ट्विटरवर अपलोड केलेला आहे. यासोबत अन्नामलाई यांनी लिहिले की, हिंदू धर्माचे निर्मूलन करणे हा इंडिया आघाडीतील प्रत्येक पक्षाचा बहुतेक प्राथमिक उद्देश दिसतो. यामधून इंडिया आघाडीचे खरा हेतू सर्वांसमोर आला आहे.
हाच व्हिडिओ भाजपाच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून पोनमुडी यांच्या भाषणावर टीका केली आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मतपेटीच्या राजकारणासाठी सनातन धर्मालादेखील सोडत नाहीत, असा एकंदरीत टीकेचा सूर भाजपाकडून लावण्यात आला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आरोप केला की, काँग्रेस आणि त्यांचे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पूर्ण विचारपूर्वक हे धोरण आखले आहे. “काँग्रेस आणि इंडी आघाडीने (INDI Alliance – असा जाणीवपूर्वक उल्लेख केला) एक स्पष्ट करावे की, कोणत्याही धर्माविरुद्ध आक्षेपार्ह विधान करण्याचा अधिकार संविधानाने त्यांना दिला आहे का? इंडी आघाडीच्या नेत्यांना संविधानातील तरतुदी माहीत नाही का? जेपी नड्डा यांनी ट्विटरवर म्हटले की, मोहब्बत की दुकानात सनातन धर्माविरुद्ध द्वेष का विकला जात आहे? यांचे उत्तर इंडिया आघाडी आणि राहुल गांधी यांनी द्यावे.
आणखी वाचा >> ‘सनातन’ वाद; ‘द्रमुक’ पक्षाचा इतिहास काय? पेरियार यांनीही केली होती हिंदू धर्मावर टीका
भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. देशाच्या संस्कृती आणि वारश्याचा दररोज अपमान होत असताना काँग्रेसचे नेते गप्प का बसले आहेत? असा सवाल उपस्थित केला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते चंद्रशेखर आणि समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी मनुस्मृतीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचाही दाखला देऊन टीका केली. रवि शंकर प्रसाद म्हणाले की, विरोधकांनी जो अपप्रचार सुरू केलाय त्याबाबत आम्ही बोलूच. पण आगामी निवडणुकीतम आम्ही विकास आणि भारताचा वारसा यावरही बोलू.