चालू वर्षाच्या शेवटी पाच राज्यांत विधानसभा निवडणुका, तर पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी सर्वच प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपाला शह देण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या रुपात एकत्र आले आहेत. २०२४ सालची लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे इंडिया आघाडीत हालचालींना वेग आला आहे. या आघाडीकडून वेगवेगळ्या राज्यांतील जागा वाटपावर चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी दिल्लीत पहिली बैठक झाली असून राज्यस्तरावर जागा वाटप केले जाईल, असे या बैठकीत ठरवण्यात आले.

पहिली सभा भोपाळमध्ये होणार

बुधवारी (१३ सप्टेंबर) इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. जागा वाटपाचे सूत्र हे राज्यस्तरावर ठरवले जाणार आहे. म्हणजेच देशपातळीवर जागा वाटपासाठी समान सूत्र नसेल. याच बैठकीत आघाडीची पहिली जाहीर सभा मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या काही महिन्यांत मध्य प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक लक्षात घेता विरोधकांच्या आघाडीने हा निर्णय घेतला असावा, असे म्हटले जात आहे.

राज्य पातळीवर होणार जागा वाटपाचा निर्णय

दरम्यान, इंडिया आघाडीच्या आम आदमी पार्टी (आप) या घटक पक्षाने मध्य प्रदेशमधील १० जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. भाजपाला सत्तेतून खाली खेचून येथे सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात आहेत. असे असताना आप पक्षाने मध्य प्रदेशमध्ये १० जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष राज्यस्तरावरील जागा वाटपाच्या कार्यक्रमानुसार आघाडीतील अन्य घटक पक्षांना काही जागा देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आप पक्षाचे मध्य प्रदेशमध्ये अस्तित्व नाही. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आप पक्ष या राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.

पक्षाची कामगिरी पाहूनच जागा दिल्या जाणार

जागा वाटपासाठी समान सूत्र न ठेवता जागा वाटप राज्यस्तरावर करावे, अशी इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्षांची भूमिका होती. त्यामुळे एखाद्या राज्यात संबंधित पक्षाचे अस्तित्व लक्षात घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेण्यात येणार आहे. २०१९ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एखाद्या पक्षाची कशी कामगिरी राहिलेली आहे, हे पाहूनच संबंधित पक्षाला किती जागा द्यायच्या हे ठरवले जाणार आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जागा वाटपासंदर्भात वेगळी भूमिका मांडली. ज्या जागेवर या आधीच्या निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे, त्या जागेचा जागा वाटपादरम्यान विचार केला जाऊ नये, असे मत त्यांनी या बैठकीत मांडले.

ओमर अब्दुल्ला यांनी मांडली वेगळी भूमिका

“जी जागा इंडिया आघाडीतील घटक पक्षाने जिंकलेली असेल, त्या जागेचा जागा वाटपादरम्यान विचार होऊ नये. म्हणजेच ज्या जागा भाजपा किंवा इंडिया आघाडीत समावेश नसलेल्या कोणत्याही पक्षाने जिंकलेली असेल, अशाच जागांवर जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करावी,” असे ओमर अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान, ही बैठक संपल्यानंतर समन्वय समितीने एक संयुक्त निवेदन जारी केले. या निवेदनाच्या माध्यमातून “समन्वय समितीने जागा वाटपावर चर्चा सुरू केली आहे. लवकरात लवकर जागा वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्याचे या बैठकीत ठरले,” असे या निवेदनात सांगण्यात आले.

सीपीआय पक्षाचे नेते डी. राजा यांनीदेखील या बैठकीबाबत अधिक माहिती दिली. राज्य पातळीवर जागा वाटपावर चर्चा केली जाणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ही जागा वाटपाची चर्चा असेल, असे डी. राजा यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत जागा वाटप पूर्ण व्हायला हवे, अशी इंडिया आघीडीतील घटक पक्षांची भूमिका आहे.

जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

या समन्वय समितीच्या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी उपस्थित नव्हते. संक्तवसुली संचालनालय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहायचे असल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत जागा वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याच्या निर्णयासह भविष्यात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला. भाजपाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून उत्तर देण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. तृणमूल काँग्रेसने मात्र या निर्णयाबाबत काही आक्षेप व्यक्त केले. या निर्णयाबाबतही संयुक्त बैठकीच्या निवेदनात सविस्तर सांगण्यात आले आहे. “जे पक्ष या बैठकीला हजर होते, त्या सर्वांनी जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी करण्याच्या निर्णयाशी सहमती दर्शवली आहे,” असे या निवेदनात सांगण्यात आले. तृणमूल काँग्रेसच्या भूमिकेविषयी विचारले असता, “जे या बैठकीला उपस्थित होते, त्यांनी या निर्णयांवर सहमती दर्शवली आहे. आम्ही तृणमूल काँग्रेसशी याबाबत चर्चा करू,” असे काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.

इंडिया आघाडीच्या देशभरात सभा

आगामी काळात देशभरात इंडिया आघाडीच्या सभा घेण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. भोपाळ येथील पहिल्या बैठकीत इंडिया आघाडी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून भाजपाला घेरणार आहे.

बैठकीला कोणकोणत्या नेत्यांची उपस्थिती

दरम्यान, मुंबई येथे पार पडलेल्या आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत वेगवगेळ्या समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच बैठकीतील निर्णयाअंतर्गत समन्व समिती स्थापन करण्यात आली होती. यासह माध्यम, समाजमाध्यम तसेच संशोधनासाठी वेगवेगळ्या समिती स्थापन केल्या आहेत. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीला द्रमुक पक्षाचे नेते टी. आर. बालू, बिहारचे उपमुख्यमंत्री तथा राजद पक्षाचे नेते तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री तथा जेएमएम पक्षाचे नेते हेमंत सोरेन, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते संजय राऊत, आप पक्षाचे नेते राघव चड्ढा, डी राजा, ओमर अब्दुल्ला, पीडीपी पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, समाजवादी पार्टीचे नेते जावेद अली खान आदी नेते उपस्थित होते.