India Alliance : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडी, महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याच्या चर्चा आहेत. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानेही हा प्रत्यय आला आहे. कारण अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस यांच्यात थेट वाद पाहण्यास मिळाला. आप आणि काँग्रेस यांनी निवडणूकही स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले ओमर अब्दुल्ला?

“इंडिया आघाडीची एकही बैठक होत नाही. ही बाब दुर्दैवी आहे. असं घडत असेल तर इंडिया आघाडी बंद करुन टाका.” असं ओमर अब्दुल्लांनी म्हटलं आहे. दिल्लीत काय चाललं आहे? त्याबद्दल मी भाष्य करणार नाही. कारण मला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काही रस नाही. मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनी ठरवायचं आहे की भाजपाचा सामना कसा करायचा. यावेळी दिल्लीचे लोक काय कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मला ज्या प्रमाणे आठवतंय त्याप्रमाणे की इंडिया आघाडीचा काही विशिष्ट असा कालावधी नाही. मात्र दुर्दैव हेच आहे की जर इंडिया आघाडीची बैठक बोलवली जात नसेल तर काहीही स्पष्टता नाही. नेतृत्वाचा मुद्दा, पक्षांचा मुद्दा या सगळ्या गोष्टी अजूनही कायम आहेत. जर दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर एक बैठक बोलवली गेली तर त्यात ही स्पष्टता आणली पाहिजे. लोकसभेसाठीच इंडिया आघाडी होती तर मग ती बंद करा. जर विधानसभा निवडणुकांसाठीही इंडिया आघाडी बरोबर असणार आहे तर सगळ्यांना एक होऊन काम करावं लागेल. असं ओमर अब्दुल्लांनी म्हटलं आहे.

दिल्लीला काँग्रेस आणि आपचा वाद काय?

काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटलं होतं. त्यावरुन दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि आपच्या काही सदस्यांनी अजय माकन यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली होती. आतिशी यांनी पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला की जर अजय माकन यांच्याविरोधात कारवाई झाली नाही तर काँग्रेसला इंडिया आघाडीच्या बाहेर काढा असं आम्ही इंडिया आघाडीच्या इतर घटक पक्षांना सांगू.

अजय माकन यांनी नेमके काय आरोप केले होते?

दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र डिसेंबर महिन्यातअजय माकन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की आमची ही चूक झाली की दिल्लीत आम्ही केजरीवाल यांच्या पक्षाला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसची दिल्लीत दुर्दशा झाली. मात्र अजय माकन यांचं हे म्हणणं आप या पक्षाला मुळीच पटलं नाही. तसंच अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख अजय माकन यांनी फर्जीवाल असा केला. त्यानंतर आपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. माकन एवढंही म्हणून गेले की अरविंद केजरीवाल हे राष्ट्रद्रोही आहेत. त्यांच्या कुठलीही विचारधारा नाही त्यांच्याकडे फक्त पदाची महत्त्वाकांक्षा आहे, असंही माकन म्हणाले होते.

दिल्लीत काँग्रेसचं राजकारण कसं सुरु आहे?

दिल्लीत मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती. तेव्हापासूनच दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी अरविंद केजरीवालांना टार्गेट केल्याचं दिसून येतं आहे. दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. मात्र मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत आप ला जबरदस्त मताधिक्य मिळालं होतं. २०१३ मध्ये दिल्लीत काँग्रेसला २४. ६७ टक्के मतं मिळाली होती. २०२० हे प्रमाण ४.६३ टक्के अशा मतांवर आलं. आता काँग्रेसला इथली सत्ता हवी आहे. त्या दृष्टीने अरविंद केजरीवाल यांना टार्गेट करण्यात आलं.

इंडिया आघाडीबाबत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीही असंच भाष्य केलं की ही आघाडीत तर लोकसभा निवडणुकीपुरती होती. त्यापाठोपाठ इंडिया आघाडीची बैठक होत नसेल तर ती आघाडी बंद केली पाहिजे असं ओमर अब्दुल्लांनी म्हटलं आहे. एकंदरीतच इंडिया आघाडीत ऑल इज नॉट वेल अशीच स्थिती आहे हे दाखवणारेच हे प्रसंग आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India alliance should wind up then said jammu kashmir cm omar abdullah after clash between congress and aap scj