आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. काँग्रेसचे शिष्टमंडळ आघाडीतील घटकपक्षांशी जागावाटपावर चर्चा करत आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र सध्या वेगळी स्थिती आहे. या राज्यात तेथील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी आम्ही चर्चा करणार नाहीत, अशी भूमिका घेतली आहे. तसेच आम्ही काँग्रेसला दोन किंवा फार तर फार तीन जागा देऊ, अशी भूमिका तृणमूलने घेतली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसला दोन जागा देण्यास तयार

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या पाच सदस्यीय राष्ट्रीय आघाडी समितीकडून इतर पक्षांशी जागावाटपावर चर्चा केली जात आहे. या समितीत अशोक गेहलोत, भूपेश बघेल, मुकूल वासनिक, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश आदी काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे. मात्र, समितीच्या या सदस्यांशी चर्चा न करण्याची भूमिका तृणमूल काँग्रेसने घेतली आहे. या समितीने आतापर्यंत समाजवादी पार्टी, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी, आम आदामी पार्टी, राजद या पक्षांशी चर्चा केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रानुसार तृणमूल काँग्रेस मालदा दक्षिण आणि बहरामपूर या दोन जागा काँग्रेसला देण्यास तयार आहे.

“ममता बॅनर्जी यांच्या औदार्याची गरज नाही”

काँग्रेसने मात्र तृणमूल काँग्रेसचा हा प्रस्ताव याआधीच फेटाळलेला आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने याआधीच मालदा दक्षिण आणि बहरामपूर या दोन्ही जागा जिंकलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला ममता बॅनर्जी यांच्या औदार्याची गरज नाही. मी ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पार्टी यांच्याविरोधात लढू शकतो. मी तसेच माझे सहकारी त्या दोन्ही जागांवरून समर्थपणे लढू शकतो, असे अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले.

“…तर आणखी एखादी जागा देऊ”

तर तृणमूल काँग्रेसनेही आपल्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली. “आम्ही काँग्रेसला दोन जागा देण्याची तयारी दाखवलेली आहे. बंगालमधील ४२ जागांपैकी या दोन जागांवर काँग्रेसला ३० टक्के मते मिळाली होती, त्यामुळे काँग्रेस पक्ष आणखी जागा कशा मागू शकतो. काँग्रेसच्या नेतृत्वाने ममता बॅनर्जी यांच्याशी थेट चर्चा केल्यास आम्ही आणखी एखादी जागा त्यांना देऊ शकतो, त्यामुळे काँग्रेसच्या आघाडी समितीशी चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. आम्ही दिलेला प्रस्ताव अगदी सरळ आणि स्पष्ट आहे,” असे तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

चर्चेसाठी प्रतिनिधी पाठवला नाही

काँग्रेस पक्षाकडून पश्चिम बंगालमध्ये आणखी काही जागांचा विचार केला जात आहे. यामध्ये रायगंज, मालदा उत्तर, जांगीपूर, मुर्शीदाबाद आदी जागांचा समावेश आहे. तृणमूल काँग्रेस मात्र या मुद्द्यावर काँग्रेसशी चर्चा करायला तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या आघाडी समितीने तृणमूल काँग्रेसशी बैठकीसंदर्भात चर्चा केली होती. मात्र, तृणमूल काँग्रेसने चर्चेसाठी आपला कोणताही प्रतिनिधी पाठवलेला नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India alliance west bengal seat sharing tmc and congress clash prd
First published on: 13-01-2024 at 14:21 IST