२०२५ वर्षाअखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकींसाठी आता विरोधी पक्षानेही जोमाने तयारी सुरू केली आहे. गुरुवारी पाटणा इथे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तीन तासांहून अधिक वेळ बैठक झाली. यामध्ये आघाडीतील दोन सर्वात मोठे घटक पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीचा निकाल विजयी परिस्थितीशी सुसंगत असल्याचे म्हटले आहे. बिहारमध्ये महागठबंधन म्हणजेच महाआघाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिया आघाडीने निवडणूक लढाईची जोरदार तयारी सुरू करत पहिले पाऊल उचलले आहे. निवडणुकीसाठी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली एक समन्वय समिती स्थापन करण्यास सहमती दर्शवण्यात आली आहे. दरम्यान, आघाडीचे नेतृत्व कोण करेल आणि जागावाटपाच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसने युवा नेते कन्हैयाकुमार यांच्या नेतृत्वात ‘पलायन रोको नौकरी दो’ ही पदयात्रा काढली. यावरून राजदच्या आक्षेपांच्या वृत्तांदरम्यान मंगळवारी दिल्लीत यादव यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळे पाटणा बैठकीच्या अजेंड्यावर स्पष्टता आली”, असं एका काँग्रेस नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. समन्वय समिती निवडणुकीपूर्वी जागावाटप, प्रचाराचे मुद्दे आणि संयुक्त मोहिमा यांसह अनेक पैलूंवर चर्चा करेल. तेजस्वी यादव हे या समितीचे नेतृत्व करतील हे महत्त्वाचं आहे; कारण राजद त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून सादर करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले जाते. तसंच काँग्रेस नेते सावधगिरी बाळगत आहेत, कारण भाजपाने आधीच लालू-राबडी जंगलराज या कथेला पुनरुज्जीवित केलं आहे.
राजदने आपल्या आघाडीतील भागीदाराला २०२० च्या चुकांची पुनरावृत्ती नको असेही कळवले आहे. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसने २४३ जागांपैकी ७० जागांवर निवडणूक लढवली होती असा हा संदर्भ आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांपैकी काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसला होता, त्यांना फक्त १९ मतदारसंघातून विजय मिळवता आला होता. राष्ट्रीय जनता दलाने लढविलेल्या १४४ पैकी ७५ ठिकाणी त्यांनी विजय मिळवला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्यांना मिळालेल्या १९ जागांपैकी तब्बल १२ जागा जिंकल्या.
अलीकडेच कन्हैया कुमार यांच्या पदयात्रेमुळे मित्रपक्षांवर अप्रत्यक्षपणे दबाव वाढविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. दरम्यान, जागावाटपाबाबत चर्चा न झाल्यामुळे इंडिया आघाडीतील पक्षांना हालचालीत गती निर्माण करण्यासाठी आणि इतर चर्चेसाठी वेळ मिळण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली, तसंच स्थलांतर आणि बेरोजगारीचे मुद्दे उपस्थित करण्याचा एकमताने निर्णय घेतला. आपल्याला २० वर्षांपासूनच्या ढिसाळ सरकारपासून मुक्ती मिळवायची आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकांच्या जनादेशाचा अनादर केल्यामुळे आणि त्यांच्या वारंवार होणाऱ्या चुकांमुळे गेल्या १३ वर्षांत राज्यात स्थिर सरकार नाही.” समन्वय समितीच्या स्थापनेला दुजोरा देताना अखिल भारतीय काँग्रेस समितीचे बिहार प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी सांगितले की, “ही समिती नियमित काळानंतर बैठका घेईल. आम्ही स्थलांतर आणि बेरोजगारी या मुख्य मुद्द्यांवर कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे, आम्ही त्यापासून विचलित होणार नाही.”
मुकेश सहानींचा पाठिंबा
विकासशील इन्सान पक्षाचे प्रमुख मुकेश सहानी यांचं बैठकीला उपस्थित असणं हा एक आशादायक संकेत होता. २०२० मध्ये एनडीएचा भाग असलेले आणि त्यांनी लढवलेल्या ११ जागांपैकी चार जागा जिंकणारे सहानी एनडीएमध्ये परतण्याची योजना आखत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय ते बैठकीलाही उपस्थित होते. अत्यंत मागासवर्गीय म्हणून वर्गणीत केलेल्या मल्लाह समुदायातील सहानी यांनी २०२० च्या निवडणुकीपूर्वी महागठबंधनातून बाहेर पडून बाजी मारली. “आम्ही निषाद समुदाय आणि संबंधित जातींसाठी समर्पित कोट्याचा मुद्दा उपस्थित करत राहू. आम्ही एनडीएचा त्यांच्या इच्छेविरुद्ध भाग असतानाही ते केले”, असेही सहानी यांनी यावेळी सांगितले.
सत्ताधारी संयुक्त जनता दल-भाजपा यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस तसेच डाव्या पक्षांच्या महाआघाडीत हा सामना होईल. आतापर्यंत बिहारमध्ये भाजपाला मुख्यमंत्री करता आलेला नाही. बिहारमध्ये तगडा जनाधार असलेल्या नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या तोडीचा उमेदवार भाजपाकडे नाही, त्यामुळे येत्या निवडणुकांसाठी पक्ष पंतप्रधानांच्या प्रतिमेवर अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पुढील काही महिन्यांसाठी बिहार हे देशात केंद्रबिंदू असेल यात शंका नाही.