INDIA block collapse in West Bengal तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर रविवार (१० मार्च) ला तृणमूल काँग्रेसने राज्यातील सर्व ४२ लोकसभा जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. ममता बॅनर्जींच्या या निर्णयाने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर “ममता बॅनर्जी विश्वास ठेवण्यायोग्य नाहीत” अशा शब्दात काँग्रेसने ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. देशभरातील विरोधी पक्षांसह ममता बॅनर्जीदेखील इंडिया आघाडीत सहभागी झाल्या होत्या. मात्र जागावाटपावर एकमत न झाल्याने ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’ चा नारा दिला.
पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत युती करणे, हा काँग्रेससमोर एकमात्र पर्याय आहे. पण केरळमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांबरोबर युती होणे कठीण आहे. लोकसभेतील काँग्रेस नेते आणि पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, बॅनर्जी यांच्या निर्णयाचा त्यांना अंदाज होता, परंतु त्यांचा निर्णय बदलेल अशी पक्षाला अपेक्षा होती. ते म्हणाले, “मला याचा अंदाज आला होता. मी तुम्हा सर्वांना आधीच सांगितले होते. मात्र, पक्षाला आशा होती की, आज न उद्या त्यांचा निर्णय बदलेल. त्या जातीयवादी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी गंभीर असत्या, तर त्यांनी इंडिया आघाडीसह निवडणूक लढवली असती. त्या इंडिया आघाडीच्या सदस्य होत्या. पण त्यांनी हे सिद्ध केले आहे की, त्या विश्वास ठेवण्यायोग्य नाहीत.” असे चौधरी म्हणाले.
टीएमसीने बहारमपूर जागेसाठी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे उमेदवार अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात युसूफ पठाण यांना उभे करण्यात आले आहे. या भागात मुस्लिम समुदायाचे मत महत्त्वाचे असल्याने टीएमसीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. २०१९ मध्ये टीएमसीने काँग्रेसचे माजी आमदार अपूर्वा सरकार यांना उमेदवारी दिली होती; ज्यांचा अधीर रंजन चौधरी यांच्याकडून तब्बल ७९,००० मतांनी पराभव झाला होता.
“काँग्रेसचा पराभव व्हावा यासाठी युसूफ पठाण यांना उमेदवारी”
बहारमपूर खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भाजपावर निशाणा साधला, ते म्हणाले, “माझ्या विरोधात निवडणूक लढवणारे युसूफ पठाण किंवा इतर कोणाशीही मला काही अडचण नाही. पण मला वाटते की, भाजपा अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना मुस्लीम मतांमध्ये फूट पाडायची आहे.” ते पुढे म्हणाले की, जर टीएमसीला पठाण यांना खासदार करायचे होते. तर त्यांनी नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. “युसूफ पठाण यांना उमेदवारी देण्यामागे ममता बॅनर्जी यांचा चांगला हेतू असता, तर त्या गुजरातमध्ये इंडिया आघाडीकडून त्यांच्यासाठी जागा मागू शकल्या असत्या. परंतु त्यांनी भाजपाला मदत व्हावी आणि काँग्रेसचा पराभव व्हावा, यासाठी युसूफ पठाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे,” असे ते म्हणाले.
चौधरी म्हणाले की, बॅनर्जी पंतप्रधान मोदींचा सामना करण्यास घाबरत आहेत. त्यांनी एकट्याने लढण्याचा निर्णय घेऊन पंतप्रधानांना संदेश दिला आहे. “त्यांना वाटते की, जर त्या इंडिया आघाडीमध्ये सामील झाल्या तर केंद्र सरकार ईडी, सीबीआय पाठवेल. यामुळेच त्यांनी युतीतून माघार घेतली आहे आणि पंतप्रधानांना संदेश पाठवला आहे की, त्या आता युतीचा भाग नाहीत,” अशी टीका चौधरी यांनी केली.
इंडिया आघाडीने एकत्र येऊन भाजपाशी लढावे
“काँग्रेसने वारंवार पश्चिम बंगालमध्ये टीएमसीबरोबर जागावाटप करण्याची इच्छा जाहीर केली आहे. काँग्रेसची नेहमीच इच्छा राहिली आहे की, इंडिया आघाडीने एकत्र येऊन भाजपाशी लढावे,” असे काँग्रेसचे संपर्क प्रमुख जयराम रमेश म्हणाले. ते म्हणाले की, जागावाटपाचा निर्णय घेण्यासाठी काँग्रेसची सकारात्मक भूमिका राहिली आहे, कारण जागांबाबत एकतर्फी घोषणा होऊ नये, असे काँग्रेसचे मत होते. टीएमसीवर कोणता दबाव होता, हे मला माहित नाही. परंतु बंगालमध्ये आम्हाला इंडिया आघाडीला मजबूत करायचे होते, असे जयराम रमेश यांनी सांगितले.
हेही वाचा : बसपच्या मुस्लीम उमेदवारांमुळे सपा-काँग्रेस अडचणीत; मायावतींची निवडणूक रणनीती काय?
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी हे आरोप फेटाळत मेघालयमध्ये काँग्रेसने एकतर्फी उमेदवार जाहीर केल्यासंदर्भात सांगितले. “जर आज काँग्रेस म्हणत असेल की, टीएमसीने पश्चिम बंगालमधील ४२ उमेदवारांच्या घोषणेची वाट पाहिली नाही आणि पुढे गेले, तर मला असे वाटते की काँग्रेसला त्यांच्या भूमिकेची आठवण करून दिली पाहिजे. त्यांनी मेघालयात आपले उमेदवार जाहीर केले, ही वस्तुस्थिती असल्याचे मुकुल संगमा यांनी सांगितले.