सातव्या व अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर शनिवारी (१ जून) संध्याकाळपासून एक्झिट पोल्स बाहेर यायला सुरुवात झाली. बहुतेक सगळ्या एक्झिट पोल्सनी भाजपाप्रणीत एनडीए आघाडी पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे एक्झिट पोल्स बाहेर येण्याच्या काही वेळ आधी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुखांनी बैठक घेत आम्ही बहुमताने सत्ता प्राप्त करू, असा आत्मविश्वास व्यक्त केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नवी दिल्लीमधील घरी ही बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित असलेल्या एका नेत्याने सांगितले की, भाजपा हा सर्वांत मोठा पक्ष ठरेल. मात्र, त्याच्याकडे बहुमताचा आकडा नसेल. याबाबत बैठकीमध्ये सर्वांचे एकमत होते. जवळपास दोन तासांहून अधिक काळ ही बैठक चालली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, इंडिया आघाडीला २९५ हून अधिक जागा नक्कीच मिळतील.
आम्ही २९५ जागा जिंकू – इंडिया आघाडी
एक्झिट पोल्समधून करण्यात आलेले दावे फेटाळून लावत काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हटले, “मिस्टर नरेंद्र मोदींची खुशामत करण्यासाठी रचण्यात आलेले हे सरकारी पोल्स आहेत. जनतेचा एक्झिट पोल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही २९५ जागा जिंकू, असे यापूर्वी सांगितले आहे. भाजपाला २२०; तर एनडीएला एकूण २३५ जागा मिळतील. आम्हाला २९५ वा त्याहून अधिक जागा मिळतील. कारण- आम्ही आमच्या मित्रपक्षांना भेटून याबाबतचे गणिती विश्लेषण केले आहे. प्रत्येकाने त्यांची आकडेवारी मांडली आहे. आम्हाला खात्री आहे की, लोकांचा एक्झिट पोल इंडिया आघाडीला अनुकूल ठरणारा असेल.”
हेही वाचा : भाजपाची दक्षिणेत भरारी? एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरणार?
बहुतांश ज्येष्ठ नेते मतमोजणीच्या दिवसानंतर बुधवारी सकाळी दिल्लीत पोहोचणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. विरोधी ‘इंडिया’ आघाडीने मंगळवारी मतमोजणीच्या दिवसापूर्वी आपल्या मागण्यांच्या यादीसह निवडणूक आयोगाकडे जाण्याचा निर्णयदेखील या बैठकीमध्ये घेतला आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक बॅलेटिंग युनिट उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ आधीच्या नोंदीशी जुळणारी आहे का, तसेच १७ सी फॉर्ममधील आकडेवारी प्रत्यक्ष मतमोजणीशी जुळते आहे ना, याची खात्री करण्याची मागणी विरोधकांकडून केली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तब्बल १५० जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून धमकावले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो आहे. “या धमक्यांवरून दिसून येत आहे की, भाजपा पक्ष किती हतबल झाला आहे. आम्ही हे अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की, ४ जूनला लोकांच्या इच्छेप्रमाणेच घडेल. मिस्टर मोदी, मिस्टर शाह आणि भाजपाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागेल. इंडिया आघाडीला यश मिळेल. अधिकाऱ्यांनी दबावाखाली न येता, राज्यघटनेचे पालन करावे”, असे मत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मांडले. इंडिया आघाडीमध्ये एकजूट असल्याचा संदेश देण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित नव्हत्या. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने इंडिया आघाडीबरोबर एकत्र न येता, ‘एकला चलो रे’चा नारा दिला. त्याचप्रमाणे पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनीही काँग्रेस किंवा नॅशनल कॉन्फरन्सबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला.
इंडिया आघाडीची तब्बल दोन तास खलबते
या बैठकीला हजेरी लावणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मलिल्कार्जुन खरगे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा व के. सी. वेणुगोपाल यांचा समावेश होता. तसेच या बैठकीला समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव व राम गोपाल यादव; राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार; आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान; द्रमुकचे टी. आर. बाळू, राजदचे तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री आणि जेएमएमचे नेते चंपाई सोरेन व कल्पना सोरेन; नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला; माकपचे सीताराम येचुरी; भाकपचे डी राजा; शिवसेना – उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई; सीपीआय (एमएल)चे दीपंकर भट्टाचार्य व व्हीआयपी पक्षाचे मुकेश सहानी हे नेते उपस्थित होते.
हेही वाचा : Exit Poll: २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये एक्झिट पोलचा अंदाज किती अचूक होता?
वृत्तवाहिन्यांवरील एक्झिट पोल्सच्या चर्चेपासून दूर राहण्याच्या काँग्रेसच्या निर्णयामुळे चुकीचा संदेश जाईल, असे मत अनेक नेत्यांनी मांडले. काँग्रेसने इतर पक्षांशी सल्लामसलत न करता, हा निर्णय जाहीर केला होता. इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी त्यांचे प्रवक्ते चर्चेला पाठवायचे ठरवले होते. या निर्णयामुळे काँग्रेसने आपला पराभव मान्य केल्याचा दावा भाजपाने केला. सरतेशेवटी काँग्रेसने जाहीर केले की, काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होतील. या बैठकीनंतर खरगे म्हणाले, “या बैठकीत आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये विशेषत: मतमोजणीच्या वेळी राहणाऱ्या त्रुटी आणि येणारी आव्हाने यांवर अधिक चर्चा झाली. आमच्या कार्यकर्त्यांना द्यावयाच्या सूचना आणि मतमोजणीदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत विस्ताराने बोललो. खबरदारी म्हणून मतमोजणीच्या दिवशी काय करावे आणि अधिकाऱ्यांशी कसे बोलावे याबाबतही आम्ही कार्यकर्त्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत.” ते पुढे म्हणाले, “भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष एक्झिट पोल्सविषयी बोलत राहतील. ते त्यांच्या पद्धतीने देशात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, आम्ही देशातील लोकांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. इंडिया आघाडीला कमीत कमी २९५ जागा मिळतील. कदाचित त्याहून अधिक मिळतील; पण त्यापेक्षा कमी मिळणार नाहीत. आम्हाला विविध नेत्यांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसारच आम्ही ही आकडेवारी मांडत आहोत. या आकड्यात काहीही बदल होणार नाही. हे लोकांचे सर्वेक्षण आहे; आमचे नाही. आमच्या आघाडीतील नेत्यांना मिळालेल्या माहितीवर आधारित हा आकडा आहे. सरकारी सर्वेक्षण आणि मीडियातील भाजपाचे मित्रपक्षही त्यांचे आकडे फुगविण्याचा प्रयत्न करतील. मात्र, वास्तव काय आहे, ते सांगण्यासाठी आम्ही ही आकडेवारी समोर ठेवत आहोत.” मल्लिकार्जुन खरगे यांच्या या दाव्याला सोरेन, येचुरी व अखिलेश यादव यांनी पुष्टी दिली. ४ जूननंतर पुढील निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, “आजवर जे मतदार त्यांच्याबरोबर होते; ते आता इंडिया आघाडीकडे आले आहेत. आमची संख्या दुप्पट; तर भाजपाची निम्मी झाली आहे. हा खरा एक्झिट पोल आहे. इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे.”