Rinku Singh to marry MP Priya Saroj: आयपीएलच्या माध्यमातून प्रसिद्धिस आलेला आणि आता भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिंकू सिंह हा लवकरच लोकसभेच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे. मुळचा अलीगढचा असलेला रिंकू सिंहने (२७) भारतासाठी दोन एक दिवसीय आणि ३० टी-२० सामने खेळले आहेत. तर समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (२६) या पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. दोघांच्या कुटुंबियांनी लग्न होणार असल्याबाबत दुजोरा दिला आहे.
प्रिया सरोज यांचे वडील आणि उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील केरकट विधानसभेचे आमदार तूफानी सरोज यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना लग्न ठरल्याचे सांगितले. ते म्हणाले, “लग्न तर ठरले आहे. पण अद्याप साखरपुडा वैगरे झाला नाही. प्रिया सध्या तिरुवनंतपुरम येथे संसदीय समितीच्या बैठकीसाठी गेली आहे. तसेच रिंकूदेखील बुधवारपासून सुरू होणाऱ्या टी-२० सामन्यांसाठी व्यस्त असणार आहे. त्यामुळे काही गोष्टी अद्याप अंतिम झालेल्या नाहीत.”
प्रिया सरोज यांनी विधी शाखेची पदवी मिळविल्यानंतर लगेचच राजकारणात प्रवेश केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या २५ वर्षी निवडणूक लढवून प्रिया सरोज मछलीशहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार बनल्या. त्यांनी भाजपाच्या बी. पी. सरोज यांचा ३५,००० मतांनी पराभव केला. प्रिया सरोज या मुळच्या वाराणसीमधील असून त्यांनी दिल्लीतून शिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील तुफानी सरोज हे तीन वेळा खासदार राहिले होते. दोन वेळा सैदपूर आणि एकदा मछलीशहर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यंनी केले होते. तर २०१४ आणि २०१९ रोजी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
कोलकाता नाईट राइडर्सचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंह हा अतिशय सामान्य कुटुंबातून आला आहे. २०२३ साली आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सच्या विरोधात खेळत असताना रिंकूने यश दयालच्या अंतिम षटकात पाच षटकार ठोकले आणि सामना जिंकवून दिला होता. अशाच पद्धतीने फटकेबाजी करणाऱ्या अनेक खेळी सादर केल्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली. तसेच नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात राखीव खेळाडू म्हणूनही त्याला संघात घेण्यात आले होते.
प्रिया सरोज यांची संपत्ती
प्रिया सरोज यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे ११ लाख २५ हजार ७१९ रुपयांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले होती. त्याच्याकडे एकूण ७५,००० रुपये रोख आहेत. तर बँकेत १० लाख १८,७१९ रुपये जमा आहेत. प्रिया सरोज यांच्याकडे ३२ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने आहे.