काँग्रेस पक्षामध्ये तिकीट न मिळाल्याने संघर्ष सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आसाममधून तिकीट न मिळाल्याने काँग्रेसचे खासदार अब्दुल खालिक यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती आता समोर येत आहे. अलिकडच्या आठवड्यात आसाममध्ये काँग्रेस पक्षातून नेते बाहेर पडण्याचं हे सर्वात ताजं प्रकरण आहे. २५ वर्षांपासून काँग्रेसमध्ये असलेल्या खालिक यांनी आसाममधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोराह आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस जितेंद्र सिंह अलवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अलीकडे आसाममध्ये काँग्रेस पक्षाने एक विचित्र मार्ग स्वीकारला आहे, जिथे लोककेंद्रित मुद्दे मागे ठेवले जात आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकांमध्ये स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि एकतेची खोल भावना असणे आवश्यक आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि AICC ऑल इंडिया काँग्रेस कमिटी सरचिटणीस आणि प्रभारी यांनी अवलंबलेल्या वृत्ती आणि धोरणामुळे आसाममध्ये पक्षाच्या संधी नष्ट झाल्याचीही त्यांनी टीका केलीय.
खरं तर काँग्रेस आतापर्यंत जाहीर केलेल्या दोन याद्यांमध्ये केरळमधील एका खासदाराशिवाय केवळ दोन विद्यमान खासदारांना डावललं आहे. विशेष म्हणजे खालिकही त्यापैकीच एक आहेत. आसाममधील काँग्रेसचे इतर दोन खासदार गौरव गोगोई आणि परद्युत बोरदोलोई यांना अनुक्रमे जोरहाट आणि नागावमधून तिकीट मिळाले आहे. खालिक खासदार असलेल्या बारपेटा मतदारसंघातून काँग्रेसकडून दीप बायन यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर खालिक यांनी ज्या धुबरी मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रित केलं होतं, तिथून काँग्रेस समगुरीचे आमदार रकीबुल हुसेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या परिसीमन बदलानंतर बारपेटा मतदारसंघाच्या लोकसंख्येतील रचनेतही बदल झालाय. त्यामुळे खालिक यांना धुबरी येथे स्थलांतरित व्हायचे होते.
हेही वाचा : ओडिशामध्ये बीजेडीविरोधात काँग्रेस वापरणार ‘कर्नाटक फॉर्म्युला’!
खालिक यांना त्यांच्या पसंतीची जागा मिळू शकली नाही. परंतु गोगोई यांना जोरहाटमधून उमेदवारी देण्यात आली, कारण त्यांच्या पूर्वीच्या मतदारसंघातही सीमांकनानंतर बदल झालेत. २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून येण्यापूर्वी खालिक हे जानिया मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले होते. सीमांकनानंतर बारपेटा जागेवर अल्पसंख्याक मतदार धुबरी मतदारसंघात हस्तांतरित केले गेले आहेत, ज्या मतदारसंघातून खालिक यांना उमेदवारी पाहिजे होती. उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वी खालिक यांनी या महिन्याच्या सुरुवातीला अलवार यांना पत्र लिहून पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे आसाममध्ये मित्रपक्षाबरोबरच्या आघाडीवरूनही काँग्रेस अडचणीत आहे. काँग्रेसने आतापर्यंत फक्त एक जागा सहयोगी पक्षासाठी सोडली आहे. तिथून आसाम जातीय परिषदेच्या लुरिनज्योती गोगोई लढणार आहेत.
काँग्रेसने राज्यातील १४ पैकी १२ जागा लढविण्याची घोषणा केली असून, केवळ लखीमपूरबाबत निर्णय घेणे बाकी आहे. इतर UOFA पक्ष जसे की, तृणमूल काँग्रेस आणि CPI(M) जे इंडिया आघाडीचा भाग आहेत, त्यांनी आधीच अनुक्रमे ४ आणि १ जागेवरून उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने दिब्रुगड आणि सोनितपूर मतदारसंघातून आपले उमेदवार मागे घ्यावेत, इतर दोन ठिकाणीही आपने उमेदवार उभे केले आहेत. तिथूनही त्यांनी उमेदवारांना मागे घ्यावे. काँग्रेसने आपले उमेदवार मागे घेतले नाहीत, तर पक्ष भाजपाला जिंकून देण्यासाठी ही भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होईल, असा आरोपही आपने केलाय. मित्रपक्षांशी चर्चा सुरू असून, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यावरच स्पष्ट चित्र समोर येईल, असंही काँग्रेसचे प्रदेश प्रमुख भूपेन बोराह यांनी शुक्रवारी सांगितले.