मोहन अटाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाभुळगाव ( जि. अकोला) : मध्यंतरी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा बोलून गेले, की या देशात आता एकाच पक्षाची सत्ता असेल. याचा अर्थ कुणाला कळला नसेल, पण मला तो कळला आहे. आज देशाचे संविधान अत्यंत संकटात आहे. आज न्याय विकास आणि व्यक्तिस्वातंत्र्य याची आवश्यकता आहे. पण, तेच हिरावून घेतले जात आहे, अशा शब्दात अशा शब्दात ९३ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक लीला चितळे यांनी आपल्या भावना गुरुवारी व्यक्त केल्या. भारत जोडो यात्रेच्या ७१ व्या दिवशी लीला चितळे यांनी पातूर ते वाडेगाव दरम्यान खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. काही अंतर त्या सोबत पायी देखील चालल्या. राहुल गांधी एका चहाच्या टपरीवर त्यांच्या सोबत संवाद साधला.

हेही वाचा… एक शक्ती आहे…जी पुढे ढकलते आहे….कन्याकुमारी पासून पायी चालत असलेल्या तरुणीच्या भावना

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना लीला चितळे म्हणाल्या, आज देशाची जी परिस्थिती आहे, त्यामुळे मी निराश झाली आहे, आजच्या परिस्थितीत मी काय बोलायचे , हे माझे सरकार ठरवणार असेल, मी काय बोलल्यानंतर मला ईडी येऊन ताब्यात घेत असेल, तर हे मला मान्य नाही. मी वयाच्या बाराव्या वर्षी स्वातंत्र्यासाठी मी एक दिवसासाठी तुरुंगात गेले होते, त्यामुळे मी स्वातंत्र्याचाच गंडा हाताला बांधला आहे. पण आज देशात नागरिकांचे व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित नाही. मला काँग्रेसच्या युवा पिढीकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत.

हेही वाचा… शेतकऱ्यांना संपवण्याचे भाजपचे धोरण; राहुल गांधी यांची टीका

संविधानाने आपल्याला जगण्याचा, बोलण्याचा अधिकार दिला आहे. पण सत्य बोलण्याचा हा अधिकारच सरकार हिरावून घेत असेल, तर तो लोकशाहीसाठी मोठा धोका ठरेल, असे मत लीला चितळे यांनी व्यक्त केले. भारत जोडो यात्रा म्हणजे योग्य वेळी, योग्य पाऊल अशी आहे. अशा पदयात्रेची दिशा महात्मा गांधी, विनोबा भावे या महान नेत्यांनी दाखवून दिली होती. असे लीला चितळे यांनी सांगितले. वयाच्या ९३ व्या वर्षी नागपूरहून पदयात्रा पाहण्यासाठी येणे कठीण होते, पण तरुणाईचा उत्साह पाहण्यासाठी मी या ठिकाणी पोहोचले, असे, त्या म्हणाल्या.

हेही वाचा… शेतकरी आत्महत्या वाढीस सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत, काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

या म्हातारीने वयाच्या १२ व्या वर्षी सत्याग्रहात एक दिवसाचा तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे गुलामगिरी काय असते आणि स्वातंत्र्य काय असते, याची पूर्ण जाणीव मला आहे. या देशाच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, पण तेच धोक्यात आले आहे, अशी खंत लीला चितळे यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India s constitution is in danger said by 93 year old woman lila chitale in bharat jodo yatra print politics news asj