India Slams Pakistan Army Chief : पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी द्विराष्ट्रीय सिद्धांताचा उल्लेख करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही राष्ट्र वेगवेगळे कसे झाले? यावर असीम मुनीर यांनी भाष्य केलं. इतकंच नाही तर, काश्मीर हा इस्लामाबादच्या गळ्याची नस असून जगातील कोणतीही शक्ती काश्मीरला पाकिस्तानपासून वेगळं करू शकत नाही, असं विधानही त्यांनी केलं. दरम्यान, पाकिस्तानी लष्कर प्रमुखांच्या या विधानाचा भारताने चांगलाच समाचार घेतला आहे. पाकिस्तानने पीओके (पाकव्याप्त काश्मीर) वरील बेकायदा ताबा सोडून हा प्रदेश खाली केला पाहिजे, असं मत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त केलं आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
असीम मुनीर काय म्हणाले होते?
इस्लामाबादमध्ये बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना असीम मुनीर यांनी १९४७ मध्ये भारताच्या फाळणीला कारणीभूत ठरलेल्या वादग्रस्त द्विराष्ट्र सिद्धांताचे समर्थन केले होते. “आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे, काश्मीर आपल्या गळ्याची नस होती, ती आपल्या गळ्याची नस कायम राहील, आम्ही हे विसरणार नाही. आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांना त्यांच्या संघर्षाच्या काळात एकटे सोडणार नाही”, असं मुनीर म्हणाले होते. पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या मुलांना आपला देश कसा निर्माण झाला हे सांगण्याचं आवाहन मुनीर यांनी केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

“आपल्या पूर्वजांना वाटायचं की, आपण प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपला धर्म आणि चालीरीती वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षाही वेगळ्या आहेत. त्यामुळे तिथेच द्विराष्ट्रीय सिद्धांताचा पाया रचला गेला. आता आपण (भारत-पाकिस्तान) दोन राष्ट्रे आहोत, आपल्या पूर्वजांनी या (पाकिस्तान) देशाच्या निर्मितीसाठी खूप त्याग केला. त्यामुळे आपल्याला देशाचं रक्षण कसं करायचं हे माहिती आहे”, असं असीम मुनीर यांनी म्हटलं.

आणखी वाचा : Nitish Kumar : नितीश कुमार पुन्हा ‘किंगमेकर’ ठरणार? जेडीयूची रणनीती काय?

‘भारताकडील शस्त्रसाठ्याला घाबरत नाही’

पुढे बोलताना असीम म्हणाले, “पाकिस्तानच्या निर्मितीची गोष्ट कुणीही विसरता कामा नये. प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीला ही गोष्ट सांगायला हवी, जेणेकरून त्यांचे पाकिस्तानशी असलेले नाते कधीही कमकुवत होणार नाही. तिसरी पिढी असो किंवा चौथी पिढी… त्यांना माहिती असलं पाहिजे की पाकिस्तान त्यांच्यासाठी काय आहे? काश्मीर ही इस्लामाबादच्या गळ्याची नस असून जगातील कोणतीही ताकद काश्मीरला पाकिस्तानपासून वेगळं करू शकत नाही. तसेच १३ लाखांचे भारतीय लष्कर आणि त्यांचं सर्व सुसज्ज शस्त्रसाठ्यालाही पाकिस्तान घाबरत नाही,” असंही ते म्हणाले.

भारताने घेतला पाकिस्तानचा समाचार

दरम्यान, भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चांगलाच समाचार घेतला. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरवरील बेकायदा ताबा सोडून हा प्रदेश खाली केला पाहिजे, असं मत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त केलं. “जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानचा काश्मीरशी संबंध फक्त पाकव्याप्त काश्मीर सोडण्यासाठीच आहे. कोणतीही परदेशी गोष्ट एखाद्याच्या गळ्याची नस कशी असू शकते? हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. पाकिस्तानशी त्याचा एकमेव संबंध म्हणजे त्या देशाने या प्रदेशावर केलेला बेकायदेशीर ताबा असून, त्यांनी तो लवकरात लवकर सोडावा”, असंही जसस्वाल यांनी ठणकावून सांगितलं आहे

‘पाकिस्तानचा तिळपापड होतोय’

मुंबईतील २६/११ बॉम्बस्फोटातील आरोपी तहव्वुर राणाचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं. त्यावर बोलताना रणधीर जयस्वाल म्हणाले, “पाकिस्तानने कितीही प्रयत्न केले तरी, ते स्वत:ची प्रतिमा स्वच्छ करू शकत नाहीत. दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून कायम त्यांना ओळखले जाईल. पाकिस्तानने आजवर अनेक दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं काम केलं आहे. तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणामुळे पाकिस्तानचा तिळपापड होतो आहे. मुंबई हल्ल्यातील इतर आरोपींना ते अजूनही संरक्षण देत आहेत.”

दरम्यान, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताविरोधात गरळ ओकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्यावर्षीही पाकिस्तानने भारताचा संबंध दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. “भारत आपल्या भूमीवर दहशतवादी वाढवत असून त्यांचा वापर पाकिस्तानी नागरिकांवर हल्ले करण्यासाठी करीत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणे ही भारताची सवय होत चालली आहे”, असं विनोदी विधान पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी केलं होतं.

हेही वाचा : भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची ‘या’ तारखेला होणार निवड? बैठकीत काय चर्चा झाली?

‘पाकव्याप्त काश्मीर खाली करावा लागेल’

यापूर्वीही २५ मार्चला संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रस्थापित सुधारणांवरील चर्चेदरम्यान पाकिस्तानने जाणीवपूर्वक जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळीही भारताने पाकिस्तानची चांगलीच कानउघडणी केली होती. पाकिस्तानने काश्मीरमधील जो काही प्रदेश बेकायदा भाग व्यापला आहे, तो त्यांना खाली करावाच लागेल. पाकिस्तान वारंवार आमच्या जम्मू आणि काश्मीरवर निराधार आणि अनावश्यक वक्तव्ये करतो. जर पाकिस्तानला शांतता हवी तर त्यांना आधी दहशतवाद आणि द्वेष पसरवणे बंद करावे लागेल, असं भारतानं ठणकावून सांगितलं होतं.

‘पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग नाही’

गेल्या काही दशकांपासून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा पूर्ण काश्मीरप्रमाणेच चर्चेचा आणि वादाचा राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धामध्ये पाकिस्ताननं काश्मीरचा हा भाग बळकावला. तेव्हापासून पाकव्याप्त काश्मीर हा दोन्ही देशांमध्ये वादाचा मुद्दा राहिला. भारतात आजपर्यंत सत्तेत आलेल्या सरकारांना पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतीय भूमीचा भाग करण्यात अपयश आलं असताना विरोधी पक्षांनी सातत्याने या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. दरम्यान, पाकिस्तान हा काश्मीरवर वारंवार दावा करतो. परंतु, गेल्यावर्षी ४ जूनला पाकिस्तान सरकारने न्यायालयात युक्तीवाद करताना स्वत: पीओकेबाबत महत्वाची कबुली दिली होती. “पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके हा भूभाग पाकिस्तानचा नाही. ही परकीय भूमी आहे”, असे पाकिस्तान सरकारने मान्य केले होते. काश्मिरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्या अपहरण प्रकरणाची सुनावणी सुरू असताना इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर त्यांनी यावर कबुली दिली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India slams pakistan army chief asim munir on kashmir pok statement sdp