लातूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने येत्या शुक्रवारी (११ ऑगस्ट) निलंगा येथे वृंदावन मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा व ‘धोंडे जेवणा’चे आयोजन करण्यात आले आहे. समाज माध्यमावरून याची प्रसिद्धी करण्यात येत आहे. अधिकमासात जावायाला दान करून त्याला पुरणाचे जेवण दिले जाते. त्याला धोंडे असे म्हणतात. काँग्रेसचे जेवण मिळेल पण जावई कोण, ही चर्चा आता रंगू लागली आहे.
कार्यक्रमास प्रमुख वक्ते माजी मंत्री व लातूरचे आमदार अमित देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार धीरज देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंखे हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे नेते अशोक पाटील निलंगेकर राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. अरविंद भातांब्रे हे आहेत.
हेही वाचा – राष्ट्रवादीच्या फलकावर अजितदादा-फडणवीस साथसाथ
आपल्याकडे धोंडे जेवणाची प्रथा ही अनेक वर्षांपासूनची आहे. प्रामुख्याने सासुरवाडीमध्ये जावयाला जेवणाचे निमंत्रण दिले जाते, आहेर करून त्याला वाणही दिले जाते. काही ठिकाणी यानिमित्ताने आपल्या मित्रपरिवारांनाही जेवणाचे निमंत्रण दिले जाते. मात्र, आजपर्यंत एखाद्या राजकीय पक्षाने मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना धोंडे जेवण देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. मेळाव्याच्यानंतर भोजनाची व्यवस्था केली जाते. मात्र, अधिकृतपणे धोंडे जेवण असे सांगून निमंत्रण देणे हे पहिल्यांदाच घडते आहे.
निलंग्यात प्रश्न असा पडतो आहे सासुरवाडी निलंगा कोणाची? जावई कोण? जेवण नेमके कोणासाठी? कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सगळ्याच कार्यकर्त्यांना धोंडे जेवण म्हणजे कार्यकर्ते हे जावई झाले. आजकाल सर्वच पक्षांत कार्यकर्त्यांची वानवा आहे. त्यामुळे जावयासारखा त्यांना मान द्यावा लागतो. त्यातल्या त्यात काँग्रेस पक्ष सत्तेत नसल्याने काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची चणचण अधिक आहे. त्यामुळे कदाचित या धोंडे जेवणाचे आयोजन केले असावे, असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – पुण्याचे पालकमंत्री नक्की कोण?
निलंगा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठीची ही पायाभरणी असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. पायाला धोंडे लागतात त्यामुळे हे धोंडे जेवण आहे असाही अंदाज व्यक्त केला जातो आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंखे हे शिवसेनेचे उमेदवार होते. डॉ. अरविंद भातंब्रे वंचित विकास आघाडीचे उमेदवार होते. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार होते. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे तेव्हा बंडखोरी करून निवडणूक लढवली होती ते लिंबन महाराज सध्या उद्धव ठाकरे शिवसेनेत आहेत.
तीन वेळा निवडून आलेल्या आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने सर्व ताकद पणाला लावत आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. पक्ष ज्याला उमेदवारी देईल तो उमेदवार असेल आम्ही सगळे मिळून लढा देऊ. कार्यकर्त्यांमध्ये आपापसात स्नेह राहावा यासाठी हे धोंडे जेवण असल्याचे काहीजणांचे म्हणणे आहे. काँग्रेस पक्षाने जाहीरपणे निलंग्यात धोंडे जेवण ठेवल्यामुळे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील कार्यकर्त्यांच्याही आता अपेक्षा वाढल्या आहेत.