संतोष प्रधान
इंडियाच्या पार पडलेल्या बैठकीत राज्यनिहाय जागावाटपाची प्रक्रिया सुरू करून ती लवकरात लवकर संपवावी, असा निर्णय घेण्यात आला असला तरी महाराष्ट्रातील जागावाटप तितकेसे सोपे नाही.
राज्यातील ४८ जागांपैकी गेल्या वेळी शिवसेनेने भाजपबरोबर युतीत १८ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी चार तर काँग्रेसने एक जागा जिंकली होती. गेल्या वेळच्या जिंकलेल्या जागा सोडून हे सूत्र निश्चित केल्यास २३ जागांचा प्रश्न मिटतो. उर्वरित २५ जागांवर चर्चा करावी लागेल. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर या दोन्ही पक्षांची ताकद कमी झाली आहे. यामुळे सर्व ४८ जागांवर चर्चा व्हावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
आणखी वाचा-मध्य प्रदेश ते राजस्थान, देशात भाजपाचे आता ‘यात्रा पर्व’; आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार!
गेल्या वेळी जिंकलेल्या १८ जागा शिवसेनेचा लढवेल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. यापैकी १३ खासदार हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. काही मतदारसंघांत ठाकरे गटाचे अस्तित्व फारच कमी असल्याचे बोलले जाते. जागावाटपात राष्ट्रवादी नेहमीच ताणून जास्त जागा पदरात पाडून घेते हे यापूर्वीही अनुभवास आले. यामुळे शरद पवार यांचा गट जागावाटपात तडजोड करण्याची शक्यता कमी आहे.
पक्षातील काही जणांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीची ताकद कायम असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. जागावाटपात जास्त जागा मिळाव्यात, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.