इस्रोकडून प्रक्षेपित केले गेलेले चांद्रयान-३ आज (दि. २३ ऑगस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. यानंतर देशभरातून एकच जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट दक्षिण आफ्रिकेतून या सोहळ्याला ऑनलाईन हजेरी लावली होती. मोहीम यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे आभार मानले. चांद्रयानचे अवतरण होत असताना काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताचा अंतराळ कार्यक्रम १९६२ साली सुरू झाला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी ज्येष्ठ वैज्ञानिक होमी भाभा आणि विक्रम सारभाई यांच्या जोडीने भारताच्या अंतराळ संशोधनाची सुरुवात केली होती.
चांद्रयान-३ पृष्ठभागावर उतरत असताना काँग्रेसने भाजपावर टीका करण्याची संधी साधली. काँग्रेसचे संवाद विभागाचे प्रमुख, खासदार जयराम रमेश म्हणाले की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली चांद्रयान मोहिमेची सुरुवात झाली होती. ही मोहीम नंतर आलेल्या सरकारने पुढे नेली. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त करतो.
हे वाचा >> चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करण्यासाठी झटलेले रिअल ‘हिरो’
आज (दि. २३ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजून ०५ मिनिटांनी चांद्रयान-३ उपग्रहाचे विक्रम हे लँडर मॉड्यूल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग करणाऱ्या देशांच्या ओळीत यामुळे भारताचाही समावेश झाला आहे. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी ट्विट करत म्हटले की, भारताची अंतराळ संशोधन मोहीम २३ फेब्रुवारी १९६२ रोजी सुरू झाली. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च (INCOSPAR) या संस्थेची स्थापना केली होती. डॉ. होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांची दूरदृष्टी आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे हे शक्य झाले होते.
जयराम रमेश पुढे म्हणाले, INCOSPAR या संस्थेची स्थापन केल्यानंतर त्यामध्ये देशभरातील नावाजलेल्या संस्थांमधील शास्त्रज्ञांना एकत्र आणले गेले होते. त्या सर्वांचे एकत्रित प्रयत्न आणि सहयोगातून देशात वैज्ञानिक चळवळ सुरू झाली. INCOSPAR स्थापनेसंबंधी त्या काळात वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांचे कात्रणही जयराम रमेश यांनी ट्विटरवर शेअर केले.
आणखी एका पोस्टमध्ये जयराम रमेश म्हणाले की, २५ डिसेंबर १९७१ रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे इस्रोचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न उभा राहिला होता. पण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वामुळे प्रा. सतीश धवन यांच्यासारखा कर्तुत्ववान वैज्ञानिक इस्रोला मिळाला.
आणखी वाचा >> प्रा. सतीश धवन; भारतीय अंतराळ क्षेत्राला नवा आयाम देणारा वैज्ञानिक
दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना काँग्रेस नेते राजीव शुक्ला म्हणाले की, चांद्रयान मोहीम माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात सुरू झाली होती आणि नंतर आलेल्या सरकारने त्याला आणखी पुढे नेण्याचे काम केले. वैज्ञानिकांनी हाती घेतलेल्या या कामात यश मिळावे, अशा शुभेच्छा देतो.
चांद्रयान-३ मोहिमेचे श्रेय भाजपाकडून लाटण्याचा प्रयत्न होत आहे, असा प्रश्न विचारला असता शुक्ला म्हणाले की, २०१४ च्या आधीही भारत देश होता आणि आधी झालेल्या सर्वच पंतप्रधानांनी देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. तसेच भाजपाचे नेते आता अटल बिहारी वाजपेयी यांचेही योगदान मानायला तयार नाहीत का? असा प्रतिप्रश्न शुक्ला यांनी उपस्थित केला.