मोहन अटाळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बोराळा (जि. वाशीम ) : महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील करून टाकले आहे. सरकारने लोकांना अनेक आश्वासने दिली होती. ती पूर्ण होऊ शकली नाहीत. गावकऱ्यांना स्वयंपाकाच्या गॅसची शेगडी मिळाली खरी, पण आता महागडे सिलिंडर कोण घेऊ शकणार. शेतीतून फारसे उत्पन्न हाती लागू शकणार नाही, सरकारकडून तोकडी मदत मिळाली आहे. शेतकरी नैराश्यात पोहोचले आहेत. तोंडगावचे शेतकरी आपल्या मनातील भावना व्यक्त करतात.
हेही वाचा… वादग्रस्त विधान करणारे राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह
खासदार राहुल गांधी यांची पदयात्रा पश्चिम विदर्भात दाखल झाली असून, तोंडगाव येथील सुमारे १ हजार ग्रामस्थ या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. सोबत अनेक आशा स्वयंसेविका देखील आहेत. त्यांना आपले प्रश्न राहुल गांधी यांच्या समोर मांडायच्या आहेत, भेट होईल की नाही माहिती नाही, पण माध्यमांनी त्यांच्या समस्या राहुल गांधी यांच्या पर्यंत पोहोचाव्यात, अशी अपेक्षा आशा स्वयंसेविका व्यक्त करतात.
तोंडगावचे सारंग जिजिबा गोटे सांगतात, यंदा अति पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. सोयाबीन परतीच्या पावसाने उध्वस्त केले. उत्पन्न कमी होणार आहे. सरकारने दुप्पट नुकसान भरपाई देऊ, असे सांगितले खरे, पण शेतकऱ्यांना हेक्टरी ६ हजार रुपयेच मिळाले आहेत. अजूनही अनेक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचू शकलेली नाही. तुरीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, एकीकडे पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून रस्ते चांगले करण्याचा दावा सरकारकडून करण्यात येतो, पण शेतकऱ्यांसमोर खरा प्रश्न आहे, तो पांदन रस्त्यांचा. जो काही शिल्लक शेतमाल हाती आला, तो बाजारापर्यंत नेण्यासाठी पांदन रस्ते चांगले हवेत. त्यांची अवस्था एवढी बिकट आहे, की अनेक शेतकऱ्यांना मशागतीसाठी देखील शेतात पोहोचणे अवघड झाले होते. समृद्धी महामार्ग आमच्या जिल्ह्यातून जातोय. या महामार्गाच्या माध्यमातून शेतमाल थेट मुंबईच्या बाजारात नेता येईल, असे स्वप्न दाखवण्यात आले. पण शेतमाल शेतातून नेण्याच्या व्यवस्थेचे काय, असा प्रश्न सारंग गोटे विचारतात.
हेही वाचा… धुळ्यासाठी मंजूर ३० कोटींच्या निधीचे म्हणणे तरी काय ? श्रेयवादावरून एमआयएम विरुध्द भाजप जुगलबंदी
गावातीलच नंदा गोपाल जाधव या आशा स्वयंसेविका सांगतात, मानधन वाढीची आमची मागणी आहे, पण आमच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. राहुल गांधी यांच्या पर्यंत आमच्या मागण्या पोहोचल्या पाहिजेत. ते निश्चितपणे आम्हाला न्याय देऊ शकतील, असा विश्वास आम्हाला आहे. आम्ही त्याच्यासोबत वाशीम पर्यंत ३० किलोमीटर पायी चालणार आहोत. या पदयात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सरकारच्या कानापर्यंत पोहचत असतील, अशी भावना नंदा जाधव व्यक्त करतात. आशा स्वयंसेविका यांना केवळ तीन हजार रुपये दरमहा मानधन मिळते, आताच्या महागाईच्या काळात येवढ्या रकमेत महिनाभर गुजराण कशी करायची, हा आमचा प्रश्न आहे, किमान दहा रुपये मानधन मिळायला पाहिजे, असे त्या सांगतात. गावातील महिलांच्या अनेक अडचणी आहेत. घरोघरी स्वयंपाकाच्या गॅसचा शेगड्या आहेत, पण महागडे सिलिंडर खरेदी करण्याची लोकांची ऐपत नाही. गावातील पन्नास टक्के लोकांच्या घरातील शेगड्या बंद पडल्याचे, अनेक महिला सांगतात.