प्रबोध देशपांडे
अकोला : वन विभागाच्या क्षेत्रात येणाऱ्या मार्गावरील काँग्रेस नेते खा. राहुल गांधींचा ‘भारत जोडो’ यात्रेतील प्रवास मोटारीने (कार) राहणार आहे. या क्षेत्रात यात्रेमुळे पर्यावरण हानी व वन्य प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून राहुल गांधींनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. सुरक्षेचे कारण देखील पुढे आले आहे. वाशीम जिल्ह्यातील मेडशी ते पातुरपर्यंतचे अंतर राहुल गांधी वाहनाद्वारे पार करतील. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातूनही एक टप्पा ते वाहनाद्वारे पूर्ण करणार आहेत.
देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी, व्यापारी, शेतमजुरांसह जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राहुल गांधी यांची ३५०० कि.मी.ची भारत जोडो पदयात्रा सुरू आहे. या यात्रेत राहुल गांधी जनतेशी संवाद साधत आहेत. ही पदयात्रा महाराष्ट्रातील नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार आहे. गांधी घराण्यातील व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनाची मोठी लगबग काँग्रेसमध्ये सुरू आहे. अकोला जिल्ह्यात यात्रेचे १६ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. मेडशीवरून ही यात्रा जिल्ह्यात दाखल होईल. मेडशी ते पातुरपर्यंतचा जंगल परिसर आहे. या परिसरातून राहुल गांधी मोटारीने प्रवास करणार आहेत. भारत जोडो यात्रेमुळे पर्यावरणाची नुकसान होऊ नये व वन्यजीवांना देखील यात्रेमुळे होणारा संभाव्य त्रास टाळण्यासाठी वन विभागाच्या परिसरात मोटारीने प्रवास करण्याचा निर्णय राहुल गांधींनी घेतल्याचे यात्रा समन्वयकांनी सांगितले. तसेच राहुल गांधी यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. सुरक्षा यंत्रणेने देखील जंगल परिसरातून पदयात्रा काढू नये, असे सुचवल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे कन्याकुमारीपासून पदयात्रा झाल्यानंतर प्रत्येक वन विभागाच्या क्षेत्रात लहान-लहान टप्प्यांमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेचा मोटारीने प्रवास सुरू आहे. त्यानुसारच वाशीम जिल्ह्यातील मेडशी ते पातुरपर्यंतचा राहुल गांधींचा प्रवास मोटारीने पूर्ण होईल. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात देखील एका टप्प्यात त्यांचा मोटारीने प्रवास राहणार आहे. शेगाव येथे १८ नोव्हेंबरला राहुल गांधींची सायंकाळी ५ वाजता सभा आहे. त्यासभेपूर्वी बाळापूर ते शेगावदरम्यान मार्गात त्यांचा मुक्काम व एका तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्याचे नियोजन आहे. या मार्गात देखील वेळेच्या नियोजनानुसार त्यांचा मोटारीने प्रवास होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ ही पदयात्रा आहे. मात्र, सुरक्षा व वन क्षेत्रामुळे काही टप्प्यात राहुल गांधी मोटारीने प्रवास करणार आहेत. त्यामुळे यात्रेच्या ‘पद’ या मूळ उद्देशालाच छेद जात आहे.
वन क्षेत्रात नियमभंगची शक्यता
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेचा मोठा लवाजमा आहे. वन क्षेत्रात पर्यावरण हानी व वन्यजीवाचा त्रास टाळण्यासाठी राहुल गांधी मोटारीने प्रवास करतील. मात्र, इतर मोठ्या यंत्रणेचे काय? असा प्रश्न निर्माण होतो. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सार्वजनिक मार्गावरून जाणार आहे. त्यांना पदयात्रेसाठी वन विभागाकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची गरज नाही, असे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.