मुंबई : कोलकाता येथील आर.जी. कार वैद्याकीय महाविद्यालयातील दुर्दैवी घटनेच्या तपासाची प्रक्रिया जलद गतीने करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहण्यात येईल. तसेच केंद्रीय आरोग्य संरक्षण कायद्याबाबत केंद्रीय गृहमंत्री व आरोग्य मंत्री यांच्यासोबत तातडीने चर्चा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान शुक्रवारीही संप सुरूच राहणार असल्याचे मार्डकडून सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी कोलकाता येथे झालेल्या दुर्दैवी घटनेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांनी कोलकातामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्याबरोबरच पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तात्काळ व निष्पक्ष चौकशीची मागणी असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या अनुषंगाने तात्काळ केंद्रीय आरोग्य संरक्षण कायदा लागू करण्याची गरज या बैठकीत अधोरेखित केली. मुख्यमंत्र्यांनी समस्येची गांभीर्याने दखल घेत त्यावर विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच पश्चिम बंगालमधील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्याचे तसेच या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यासाठी गृहमंत्र्यांना पत्र लिहिण्याचे आणि केंद्रीय आरोग्य संरक्षण कायद्याबाबत स्वत: गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मुंबई महानगरपालिकेच्या वैद्याकीय महाविद्यालयांमधील सुविधांबाबत त्यांनी आयुक्तांशी संवाद साधून वसतिगृहाच्या वाटपाच्या प्रक्रियेला गती देण्यास सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interaction with home minister health minister regarding resident doctor queries print politics news amy