उत्तर प्रदेशातील काँग्रेसची “आझादी की गौरव यात्रा” सुरू झाली आहे. या यात्रेला कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मनावर नाराजीचे सावट आहे. या यात्रेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असला तरी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांच्या मनात निराश निर्माण करणारी होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्ताने देशभरात सर्वपक्षीय कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याच निमित्ताने काँग्रेसने ‘आजादी की गौरव यात्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी ज्या संख्येने कार्यकर्ते येणे अपेक्षित होते त्या संख्येने ते आले नाहीत. पहिल्या दिवशी मोहरममुळे यात्रेला मिळालेला प्रतिसाद मर्यादित असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले आणि १५ ऑगस्टपर्यंत यात्रेला मोठा प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली. यात्रेच्या शुभारंभाला राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रियांका गांधी या राज्यातील प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहत होत्या. राज्याचे वेगवेगळे विषय मांडत होत्या. महिलांवर अत्याचार झाला तर यंत्रणेशी झगडून त्या पीडितेच्या कुटुंबाला भेटत होत्या. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रियांका गांधी इथे फिरकल्याच नाहीत. इतक्या महिन्यात फक्त एकदाच त्या राज्यात जाहीर कार्यक्रमात सहभागी झाल्या. याबाबतबी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. साध्य त्या कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत. राजकीय घडामोडींवर काँग्रेसच्या प्रतिक्रिया पक्षाचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी किंवा इतर नियुक्त प्रवक्ते देत आहेत. याशिवाय विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी मार्चमध्ये राजीनामा दिला होता. सहा महिने राज्य काँग्रेस प्रमुख नसल्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा एकत्र येण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण होत आहे.
काँग्रेस नेतृत्वाने संघटनेचे सहा झोनमध्ये विभाजन करून कार्यरत प्रदेशाध्यक्ष नेमण्याचा प्रयोग केला आहे. तरी सध्याची मांडणी आणि परिस्थिती पाहता बहुतांश ज्येष्ठ नेते अशी जबाबदारी स्वीकारण्यास इच्छुक नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाची अशी बिकट परिस्थिती आहे की गेल्या महिन्यात राज्य काँग्रेसच्या मुख्यालयात भाजपचे झेंडे सापडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, दिल्लीतील नेत्यांनी लखनौमधील कर्मचार्यांना ध्वजांच्या शोधाचे चित्रीकरण करून ते पाठवण्यास सांगितले होते. पण व्हिडिओ लीक झाला.