महेश सरलष्कर
शिवसेनेच्या अंतर्गत बंडाचा थेट परिणाम पक्षाच्या खासदारांवरही होणार आहे. पण, सध्या महाराष्ट्रात अत्यंत नाट्यमय घटना होत असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत शिवसेनेच्या खासदारांची ‘’झाकली मूठ सव्वालाखाची’’ असेल. शिवसेनेचे लोकसभेत राज्यातून १८ तर, राज्यसभेत तीन खासदार आहेत. मुंबईबाहेरील शिवसेनेचे खासदार आतातरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असले तरी, अनेक खासदारांनी पक्षातील घडामोडींवर न बोलणे पसंत केले आहे. ‘’नजिकच्या भविष्यात काय होईल त्यावर आमचेही भविष्य ठरेल’’, असे सांगत खासदारांनी ‘’वेट अँड वॉच’’चे धोरण अवलंबलेले आहे.
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र व लोकसभेतील खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे बारणे नेमके कोणाच्या गटात, हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. त्यावर, ‘’मी कुठेही गेलेलो नाही. मी पुण्यात आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी मी एकनिष्ठ आहे. श्रीकांत शिंदे यांच्याशी मैत्री आहे याचा अर्थ मी शिंदे गटात सामील झालो असा होत नाही. माझ्यावर शंका घेणारी वृत्ते मला न विचारताच प्रसिद्ध झाली आहेत’’, असे स्पष्टीकरण बारणे यांनी दिले.
शिवसेनेच्या एका खासदाराने ‘’मन की बात’’ बोलून दाखवली. हे खासदार उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत आणि त्यांना शिवसेना सोडूनही जायचे नाही. पण, त्यांनी दोन्ही काँग्रेसशी झालेल्या शिवसेनेच्या आघाडीवर नाराजी व्यक्त केली. ‘’शिवसेनेच्या आमदारांप्रमाणे खासदारांच्या मनातही खदखद आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून शिवसेनेला काय मिळाले, असा प्रश्न आमदार विचारत आहेत. खासदारांनी आतापर्यंत हा प्रश्न उघडपणे विचारलेला नाही इतकेच. माझ्या लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसशी थेट संघर्ष करावा लागतो. इतकी वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात लढलो, पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने काय करायचे? मतदारसंघ सोडून द्यायचा का? भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे मी खासदार झालो पण, त्यानंतर लगेचच राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. आम्हालाही लोकसभेत भाजपविरोधात भूमिका घ्यावी लागली. आमचीही अडचणी झालीच होती’’, अशी प्रतिक्रिया आडपडदा न ठेवता या खासदाराने व्यक्त केली.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, रामटेकचे कृपाल तुमाने, उस्मानाबादचे ओमराजे निंबाळकर असे काही खासदार मुंबईत आहेत. काहींनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. पालघरचे खासदार राजेंद्र गावित म्हणाले की, मी शिवसेनेत आहे, तिथेच राहीन. लोकसभेचा कार्यकाल संपण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी आहे. तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी गेलेले असेल. त्यामुळे घडामोडींवर यापेक्षा जास्त भाष्य करणे योग्य ठरणार नाही! हेमंत पाटील म्हणाले की, शिवसेनेने आम्हाला मोठे केले. शिवसेनेला सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही.
यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी निवेदन प्रसिद्ध करून शिवसेनेने भाजपशी युती करण्याची विनंती केली आहे. या निवेदनातून त्यांची भूमिका स्पष्ट होत असली तरी, त्यांनी अधिक भाष्य केलेले नाही. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला भावना गवळी गैरहजर होत्या. त्यांच्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जात आहे. खासदारांच्या भूमिकेसंदर्भात अरविंद सावंत म्हणाले की, भावना गवळी गैरहजर राहिल्याची कारणे उघड आहेत. एकनाथ शिंदेंनी बंड केले मग, त्यांचा मुलगा कुठे असेल? पण, शिवसेनेचे बाकी खासदार बैठकीला हजर होते. हे सगळेच उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ आहेत!
शिवसेनेचे खासदार बैठकीला उपस्थित असले तरी, खरी शिवसेना कोणाची, या शिक्कामोर्तब होईपर्यंत न बोलणे खासदारांनी सयुक्तिक मानले आहे. ‘’आता राज्यातील घडामोडींचा थेट संबंध आमदारांशी आहे. कोण आणि किती आमदार कोणाच्या गटात कायम राहतात यावर गणित ठरणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांचे मत महत्त्वाचे ठरेल. त्यावेळी खासदारांच्या निष्ठा कुठे आहेत ते समजू शकेल’’, असे मत एका खासदाराने व्यक्त केले.