नाशिक : पुरोगामी विचारांच्या जिल्ह्यातील येवला या सुरक्षित मतदार संघात उमेदवार देताना आजवर माझी चूक झाली, अंदाज चुकला. ज्यांना तुम्ही निवडून दिले, त्यांच्या कार्यशैलीने तुम्हालाही यातना झाल्या असतील. याबद्दल आपण माफी मागत असून यापुढे अशी चूक कदापि करणार नाही, असा निर्धार व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा नामोल्लेख न करता उपस्थितांना भावनिक साद घातली.

इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची केंद्रातील सर्व यंत्रणा वापरून सखोल चौकशी करावी. काही चुकीचे घडले असल्यास संबंधितांना शिक्षा द्यावी, त्यास राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, असे सांगत पवार यांनी भाजपला आव्हान देत पक्षातील बंडखोरांविरोधात आपला पवित्रा अधोरेखीत केला.  राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर पवार यांची राज्यातील पहिली सभा शनिवारी अजित पवार गटात सामील झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मतदार संघात झाली. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेला शेतकरी वर्गासह अनेक घटकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Story img Loader