२०२३ मध्ये अण्णाद्रमुक आणि भाजपाच्या युतीला कारणीभूत ठरलेले तमिळनाडूचे भाजपाध्यक्ष अण्णामलाई हे पदावरून पायउतार होऊ शकतात. युतीबाबत बोललं जात असताना के. अण्णामलाई यांना नाइलाजानं पद सोडावं लागत आहे की, यामागे आणखी काही कारण आहे याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. “ते शिक्षा म्हणून नाही, तर जातीय समीकरणांमुळे पद सोडतील”, असं भाजपामधील काही सूत्रांचं म्हणणं आहे.
२०२६ मध्ये जर अण्णाद्रमुक आणि भाजपा यांनी एकत्रितपणे निवडणुका लढवल्या, तर या युतीचा चेहरा गुंडर हे होऊ नयेत, असे भाजपामधील काही नेत्यांना वाटत आहे. के. अण्णामलाई यांच्याप्रमाणेच अण्णाद्रमुकचे प्रमुख एडापड्डी के. पलानीस्वामी हे शक्तिशाली मागासवर्गीय समुदायाचे आणि पश्चिम कोंगू प्रदेशातील आहे. या ठिकाणीच गुंडर यांचे वर्चस्व आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अण्णामलाई यांना ही माहिती देण्यात आली. शहा यांनी पलानीस्वामी यांची भेट घेत, भाजपा आणि अण्णाद्रमुकच्या युतीच्या दिशेने पुन्हा औपचारिक पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
भाजपाच्या के. अण्णामलाई यांच्या आक्रमक भूमिकांमुळे पक्षाला तमिळनाडूमध्ये तितकं राजकीय यश मिळालेलं नाही. मात्र, त्यांच्यामुळे पक्षाला पारदर्शकता आणि दृश्यमानता मिळाली आहे. “दिल्ली त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्य पाहते. अण्णामलाई यांनी पक्षाच्या रणनीतीवर विश्वास ठेवून त्यांचं पालन करावं, अशी अपेक्षा आहे”, असे पक्षनेतृत्वाकडून अण्णामलाई यांना सांगण्यात आले.
अण्णामलाई यांनी आतापर्यंत पक्षाप्रति पूर्ण निष्ठेने काम केले. “त्यांनी पक्षाप्रतृ पूर्ण वचनबद्धता पाळली आणि ते केवळ एक कार्यकर्ता म्हणून काम करण्यासही तयार आहेत”, असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. “के. अण्णामलाई यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडलं किंवा नाही तरीही तमिळनाडूसाठी पक्षाच्या दीर्घकालीन रणनीतीमध्ये ते एक प्रमुख व्यक्ती असतील. ते राष्ट्रीय भूमिका स्वीकारतात की राज्यात वेगळी जबाबदारी स्वीकारतात हे आता आम्हाला पहायचं आहे”, असे भाजपातील आणखी एका नेत्याने सांगितले.
सूत्रांनुसार, अण्णामलाई यांच्या जागी भाजपाचे आमदार नैनर नागेंद्रन यांची निवड केली जाऊ शकते. नागेंद्रन हे तिरुनेलवेली येथील लोकप्रिय आमदार आहेत. ते प्रभावी अशा थेवर समुदायाचे असून, आधी अण्णाद्रमुक पक्षात होते. जयललिता यांच्या नेतृत्वाखाली सर्वांत मागासवर्गीय समुदायाची अण्णाद्रमुकवर चांगली पकड होती. त्यावेळी थेवर समुदायाच्या व्ही. के. शशिकला यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले होते.
“अण्णामलाई यांनी पदत्याग करणं ही एक पुनर्संचयित प्रक्रिया असेल, त्याला पदावनती मानलं जाऊ नये. भाजपाला पश्चिम तमिळनाडूपलीकडे विस्तार करायचा आहे. थेवर समुदायातील नागेंद्रन यांच्यासारख्या नेत्याला समोर आणल्यानं दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आणि त्यापलीकडे पक्षाचा प्रभाव वाढण्यास नक्कीच मदत होईल. या भागात अण्णाद्रमुक-भाजपा युतीविरुद्ध द्रमुक अशी लढत पाहायला मिळू शकते”, असे एका नेत्याने सांगितले. शहा यांच्या सोशल इंजिनियरिंग स्ट्रॅटेजीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
रविवारी कोईम्बतूर इथे माध्यमांशी बोलताना अण्णामलाई यांनी अण्णाद्रमुक-भाजपा युतीसंबंधित कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला. “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच याबाबत एका कार्यक्रमात वक्तव्य केलं आहे. त्याकडे तुम्ही अंतिम मत म्हणून पाहू शकता”, असे अण्णामलाई यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना अण्णामलाई यांनी तमिळनाडूच्या सविस्तर राजकीय अभ्यासातील त्यांच्या भूमिकेबाबत सांगितले. “एक कार्यकर्ता आणि एक नेता म्हणून मी सखोल विश्लेषण केले आहे आणि ते पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसमोर सादर करीत राज्यातील पक्षस्थिती आणि पुढच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे”, असेही ते म्हणाले.
तमिळनाडूच्या पाच विभागांतील निवडणूक गतिमानतेबाबत बोलताना अण्णामलाई यांनी सांगितले, “भाजपानं पश्चिम भागात ५४ जागा आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये ६० जागा, अशी लक्षणीय वाढ पाहिली आहे. १५० जागा जिंकण्यासाठी पक्षाला किमान तीन विभागांत जोरदार विजय मिळवावा लागेल. १८० ते १९० जागा जिंकण्यासाठी चार विभागांमध्ये वर्चस्व प्राप्त करावं लागेल. संपूर्ण दक्षिणेकडील भागात भाजपाचं अण्णाद्रमुकवर आधीपासूनच वर्चस्व आहे. त्याशिवाय द्रविडीयन पक्ष पश्चिमेकडील महत्त्वाच्या ठिकाणी भाजपाकडे दुर्लक्ष करू शकत नाही.”
“राज्यात भाजपाचा दीर्घकालीन विकास हेच पक्षाचं एकमेव ध्येय आहे. मी सत्तेसाठी राजकारणात आलो नाही, तर मला तमिळनाडूच्या राजकारणात बदल घडवून आणायचे आहेत आणि याबाबत मी कायम स्पष्ट होतो”, असे के. अण्णामलाई यांनी म्हटले आहे.
“शहा आणि पलानीस्वामी यांच्या भेटीत काहीही चुकीचं नव्हतं. भाजपा नेत्यांनी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला सावधगिरीनं भेटण्याची काहीच गरज नाही”, असेही अण्णामलाई यांनी स्पष्ट केले.
एकंदर तमिळनाडू भाजपामध्ये नक्की काय बदल होतील, तसेच हे बदल पक्षाचा विस्तार करण्याच्या हेतूने होतील की जातीय भेदांमुळे याबाबत चर्चा सुरू आहे.