औरंगाबाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणाऱ्या बंडखोर आमदारांना उंदराची उपमा देत भाषण करणारे अर्जुन खोतकर सोमवारी मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी दिलजमाई करताना दिसले. त्यांचे असे एकत्र दिसण्याचा अर्थ ते शिंदेगटात सहभागी झाले आहेत, असा काढला जात आहे. आपण शिंदे गटात गेलो आहोत, असे खोतकर यांनीही स्पष्टपणे सांगितलेले नाही. मात्र, ही दिलजमाई ‘‘ईडी’ची अगाध लीला’ असल्याचे सांगितले जात आहे. खोतकर यांच्यावर अर्जुन सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार केल्याचा ठपका सक्तवसुली संचालनालयाने ठेवला होता. चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खोतकर यांच्याकडे नुकतेच शिवसेनेने उपनेतेपद दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जालन्यातील सहकार क्षेत्रावर अर्जुन खोतकर यांचा मोठा प्रभाव राहिला. गेली १४ वर्षे जालना बाजार समितीवर त्यांचे वर्चस्व होते. गेल्या आर्थिक वर्षातील या बाजार समितीची उलाढाल ७०० ते ८०० कोटींच्या घरात होती. तर अर्जुन सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक होते.

राज्यातील ५४ सहकारी साखर कारखाने कमी किमतीमध्ये नेत्यांनी हडप करण्याचा डाव रचला होता, असा आरोप कॉ. माणिक जाधव यांनी केला होता. या आरोपांची तक्रार पुढे अण्णा हजारे व जाधव यांनी मुंबई येथील रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीत अर्जुन सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहारावरही बोट ठेवण्यात आले होते. नंतर आर्थिक गुन्हा शाखेने केलेला तपास सक्तवसुली संचालनालयाने पुढे आपल्या ताब्यात घेतला. या प्रकरणात अर्जुन खोतकर यांना नोटीसही बजावण्यात आली. या गैरव्यवहारातील तपशील भाजपचे किरिट सोमय्या यांनी वारंवार पत्रकार बैठका घेऊन जगजाहीर केले होते.

राज्य सहकारी बँकेचे ३३ कोटी रुपयांचे कर्ज परतफेड न करू शकल्याने या कारखान्याची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा विक्री करताना कारखान्याची राखीव किंमत ४२ कोटी १८ लाख रुपये एवढी जाहीर करण्यात आली. तापडिया कन्स्ट्रक्शन कंपनीने हा कारखाना विकत घेतला आणि तो पुढे अर्जुन शुगर इंडस्ट्रीजला विकला.या व्यवहारात पद्माकर मुळे व जुगलकिशोर तापडिया यांचीही ‘ईडी’ने चौकशी केली होती. कारखान्याचे मूल्यांकन ७८ कोटी ३८ लाख असताना ती किंमत कमी दाखवून हा कारखाना विकत घेण्याचा घाट घालण्यात आला. कारखाना विकत घेताना तापडिया कन्स्ट्रक्शन कंपनीला अर्जुन खोतकर यांनीच आर्थिक मदत केली, असा ठपका त्यांच्यावर आहे.

हेही वाचा- रामदास कदम यांच्या काळात औरंगाबादमध्ये शिवसेनेत जातीयवादाला खतपाणी अन् एमआयएमशी सलोखा

सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्या चर्चेला खोतकर यांनीच पूर्णविराम दिला होता. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद मेळाव्यात बंडखोर आमदारांवर टीका करताना ते म्हणाले, ‘घरात माणसं असतात, तसं उंदीरही असतात.’ बंडखोर आमदारांना उंदीर अशी उपमा दिल्यानंतर शिवसैनिकही चेकाळले. मांजर पाळा, असेही त्यांनी सुचवून पाहिले. त्यावर मी बोलू का, असे म्हणत खोतकर यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्ली येथे घडलेल्या घटनांमुळे खोतकर चर्चेत आले.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीत पक्षबदलासाठी चढाओढ

अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये २०१४ नंतर राजकीय संघर्ष कायम होता. या राजकीय संघर्षाला सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचेही पाठबळ होते. अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी गळ त्यांना घातली जात होती. जालना विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे खोतकर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये पशुसंवर्धन विभागाचे राज्यमंत्री होते. या काळात ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खोतकर यांच्यात मैत्रभाव होता. मात्र, रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात त्यांना सहभागी करून घेण्यापूर्वी या दोन नेत्यांची दिलजमाई होणे आवश्यक मानले जात होते. सोमवारी अशी दिलजमाई झाली. रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनीही दिलजमाईच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, खोतकर शिंदे गटात गेले की नाही, याची अधिकृत घोषणा सोमवारी दुपारपर्यंत झालेली नव्हती.

असाही एक वाद
विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ संपल्यानंतरही अर्जुन खोतकर यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकचा वेळ दिल्याची तक्रार प्रतिस्पर्धी उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी केली होती. उच्च न्यायालयाने हे आरोप मान्य करून खोतकर यांना विधिमंडळ सदस्य म्हणून अपात्र ठरविले होते. जालना विधानसभा मतदारसंघात खोतकर तीन वेळा गोरंट्याल यांच्या विरोधात निवडून आले आहेत. १९९० साली ते पहिल्यांदा आमदार झाले होते. घनसावंगी मतदारसंघातूनही त्यांनी एकदा निवडणूक लढविली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is arjun khotkar join shinde group ed action raosaheb danve and cm eknath shinde print politics news rmm
Show comments