जयेश सामंत, लोकसत्ता
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यावी याची जोरदार चाचपणी सध्या भाजप वर्तुळात सुरु झाली असून ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर यांच्यासह पक्षाने अन्य काही नावांवर विचार सुरु केल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.
या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी तीन आमदार भाजपचे असून मीरा-भाईदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी सत्ताबदल होताच भाजपशी पुन्हा जवळीक साधली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षाचे ठाणे लोकसभा संयोजक विनय सहस्त्रबुद्धे यांनीही लोकसभा प्रवास कार्यक्रमा अंतर्गत या संपूर्ण मतदारसंघात बैठकांचा धडाका लावल्याने मुख्यमंत्री समर्थकांच्या गोटात तर्कवितर्क सुरु झाले आहेत.
आणखी वाचा-मावळच्या आखाड्यात मनसे?
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी भाजपकडे होता. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी पुढे हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला आणि येथून शिवसेनेच्या उमेदवारांना खासदार केले. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे अशा अभ्यासू खासदारांची परंपरा लाभलेला हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याची सल अजूनही भाजपच्या जुन्या जाणत्यांच्या मनात कायम आहे. राज्यात वर्षभरापुर्वी झालेल्या सत्ताबदलानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडील १३ खासदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोटात आले आहेत. ठाण्याचे खासदार राजन विचारे मात्र अजूनही उद्धव गटात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातील मतदारसंघाचा खासदार उद्धव गटात राहील्याने इतका काळ ठाण्यावर डोळा ठेवून असणारे भाजप नेते गेल्या काही काळापासून कमालिचे सक्रिय झाले असून पक्ष श्रेष्ठींने या मतदारसंघातून नव्या उमेदवाराची चाचपणीही सुरु केल्याचे वृत्त आहे.
सहस्त्रबुद्धे यांचा लोकसभा प्रवास
भाजपने काही महिन्यांपुर्वी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती केली. मुळचे ठाणेकर असूनही बरीच वर्षे दिल्लीतील राजकारणात रमणारे सहस्त्रबुद्धे गेल्या काही काळापासून ठाणे लोकसभा क्षेत्रातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात कमालिचे सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. नवी मुंबई, मीरा-भाईदर या ठाणे क्षेत्राबाहेरील विधानसभा मतदारसंघात त्यांनी वैयक्तीक भेटी-गाठी, पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रमांचा धडाका लावला असून नवी मुंबईत गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे गटातील समर्थकांच्या स्वतंत्र्य बैठकाही ते घेताना दिसत आहेत. याशिवाय मीरा-भाईदरमध्ये आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता तेथील नवनियुक्त अध्यक्षांशी समन्वय साधण्यावर त्यांचा भर असून लोकसभा निवडणुकांच्या निमीत्ताने त्यांच्या वाढत्या बैठकांमुळे मुख्यमंत्री समर्थकांच्या गोटातही आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे.
आणखी वाचा-जयंत पाटील यांच्या विरोधकांना अजित पवारांचे बळ
केळकर पहिली पसंती ?
राजन विचारे यांनी सध्या तरी उद्धव गटातच रहाणे पसंत केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे लोकसभा मतदारसंघावरील दावा काहीसा कमी पडू लागल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांसाठी महत्वाचे मानला जातात. कल्याणमध्ये डॉ.श्रीकांत शिंदे यांची पकड असून भाजपमधून कितीही विरोधी सुर उमटत असले तरी ते हा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. असे असले तरी ठाण्यात मात्र कोणाला उमेदवारी द्यायची याविषयी शिंदे यांच्या गोटात स्पष्टता नाही. विधान परिषदेचे माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के अशी काही नावे पुढे केली जात असली तरी ही मंडळी दिल्लीस जाण्यास इच्छुक नसल्याचे बोलले जाते. या परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी दबाव वाढू लागला असून पक्षाचे नेते ज्या पद्धतीने कामाला लागले आहेत ते पहाता ही तयारी पक्की झाल्यासारखे चित्र उभे केले जात आहे. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना यासंबंधी विचारणा देखील झाल्याचे वृत्त आहे. भाजपला हा मतदारसंघ सुटल्यास केळकर ही पक्षासाठी पहिली पसंती ठरु शकतात या चर्चाना जोर आला असून स्वत: केळकर मात्र अजून पाच वर्ष ठाणे विधानसभेतून इच्छुक असल्याचे सांगितले जाते. नवी मुंबईतून संजीव नाईक आणि विनय सहस्त्रबुद्धे अशा अन्य दोन नावाची चाचपणीही पक्षात सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले.
आजवर पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती पेलण्याचा माझा प्रयत्न राहीला आहे. ठाणे लोकसभेबाबत माझ्याकडे थेट विचारणा झाली नसली तरी अशा चर्चा पक्षात आणि मित्र पक्षातील सहकाऱ्यांकडूनही माझ्या कानावर येत असतात. सध्या तरी ठाण्यातील लोकांचे काम करणे हा माझा प्राधान्यक्रम आहे. -संजय केळकर, आमदार ठाणे