छत्रपती संभाजीनगर : बीड लोकसभा मतदारसंघ बांधणीत खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांनी अलिकडेच मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. ‘मजबुरीने नको तर मला मजबुतीने काम हवे आहे’ , असे त्या नुकतेच म्हणाल्या. यातील ‘ मला’ या शब्दावरुन तसेच या लोकसभा मतदारसंघाची बांधणीत अनेक सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती आता त्या ‘अग्रेसर’ बनल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये एका घरात दोन उमेदवाऱ्या मिळण्याची शक्यता कमी असल्याने बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पक्षावर नाराज असणाऱ्या नेत्या’, अशी त्यांची माध्यमांमध्ये असणारी त्यांची प्रतिमा आता बदलू लागली आहे. शिवाय धनंजय मुंडे व पंकजा मुंडे सार्वत्रिक कार्यक्रमात एकत्र दिसू लागल्याने ‘ लोकसभे’त भावा बहिणींच्या मतदानाची बेरीज आता राजकीय पटलावर चर्चेत आहे. ‘आता फक्त ४५ दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे व्यक्तिगत कामे , प्रश्न बाजूला ठेवून सर्वांनी पुढे जायला हवे,’ असे आवाहन पंकजा मुंडे यांनी अलिकडेच कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे ‘आता आपण उमेदवार पाडायचे’, असे राजकीय भाषण करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आता पवित्रा बदलला असल्याचे पहावयास मिळत आहे. धनंजय मुंडे यांची त्यांना साथ असेल असे संकेत आता सार्वजनिक कार्यक्रमातून मिळू लागल्याने बीडच्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून डॉ. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात मनसेचे समर्थन कुणाला ? राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला

या पूर्वी वेगवेगळ्या व्यासपीठावरुन पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाषणात दोन वाक्यांमध्ये बरीच सांध असे. त्यातून रोष ताजा राहील अशी तजवीज त्या करत. मात्र, गेल्या काही दिवसातील त्यांची भाषणेही बदलली असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘दाेन समाजात मोठी दरी निर्माण होत आहे. १२ पर्यंत आम्हाला जातही माहीत नव्हती. मात्र, आाता ज्याप्रकारे लहान मुलांपर्यंत जातीचे लोण पसरले त्यामुळे आपणास फेटा बांधावासा वाटत नाही,’ असे त्या अलिकडेच एका भाषणात म्हणाल्या. महासांगवी येथील कार्यक्रमात त्यांनी केलेले हे भाषण आता चर्चेत आहे. त्यांच्या वक्तव्यांमधील ‘आपणास काही मिळाले नाही,’ हा भावही कमी झाला असल्याचे बीड जिल्ह्यातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे बीड लाेकसभेत पंकजा मुंडे ‘अग्रेसर’ बनत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

हेही वाचा : चावडी: खुंटा बळकट करण्याचाच भाग..

‘दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी ‘ सोशल इंजिनिअरिंग’ केली. प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉ. प्रीतम मुंडे यांनाही बीडच्या मतदारांनी साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत नसताना लढलो आणि जिंकलो. आता राष्ट्रवादी काँग्रेसही बरोबर आहे. त्यामुळे मताधिक्य वाढेल,’ असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी अलिकडेच व्यक्त केला. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार कोण याची चर्चाही सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे असणारी नेतृत्वाची धुरा असल्याने व तेच बीडचे पालकमंत्री असल्याने त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्याकडून उमेवार कोण हे अद्याप ठरलेले नाही. चर्चेत असणाऱ्या काही नावांपैकी लोकसभा मतदारसंघात संपर्क असणारा कोण, हा निकष महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे सांगण्यात येत आहे. राजकीय पटलावर भाजपच्या गोटात तूर्त तरी पंकजा मुंडेच अग्रेसर असल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is bjp leader pankaja munde bjp s lok sabha candidate from beed lok sabha constituency print politics news css