सोलापूर : एकेकाळी काँग्रेसचा प्रभाव राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात अलीकडे भाजपची वाढलेली ताकद रोखण्यासाठी महाविकास आघाडीने जोरात तयारी सुरू केली आहे. भाजपमुक्त सोलापूरसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि दुसरे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील या तिघांची मोट बांधली गेली आहे. यातूनच भाजपची मतपेढी म्हटल्या जाणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजाला आपलेसे करण्याच्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीत याच समाजातील वजनदार नेते धर्मराज काडादी यांच्या उमेदवारीचा घाट घातला जात आहे.

सोलापूर दक्षिण मतदारसंघातून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उडी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसच्या चिन्हावर विधानसभा लढविण्याचा त्यांचा निर्धार आहे. ते निवडणूक रणांगणावर उतरल्यास सोलापूर दक्षिणसह अक्कलकोट आणि सोलापूर शहर उत्तर या तिन्ही विधानसभेच्या जागा राखताना भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे. दिवंगत ज्येष्ठ सहकार नेते, माजी खासदार आप्पासाहेब काडादी यांचे नातू असलेले धर्मराज काडादी हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासह ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थान समिती, प्रतिष्ठित संगमेश्वर महाविद्यालय व संस्थांचे प्रमुख आहेत. याशिवाय ६२ वर्षे जुन्या दै. संचार वृत्तपत्राचे ते मालक आहेत.

आणखी वाचा-धनगर आरक्षण आंदोलन; दोघांची प्रकृती खालावली, पंढरपुरातील आंदोलनाला राज्यातून मोठा पाठिंबा

वीरशैव लिंगायत समाजाशी संबंधित अनेक संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी आजही काडादी यांचाच लवाद मान्य केला जातो. आतापर्यंत ते राजकारणापासून अलिप्त होते. सोलापूर विमानसेवेसाठी कथित अडथळा ठरल्याने सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी मागील वर्षी पाडण्यात आली होती. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा फटका भरून निघणे कठीण झाले आहे. सुमारे २७ हजार ऊस उत्पादक शेतकरी सभासद असलेला हा साखर कारखाना वीरशैव लिंगायत समाजाचे प्रमुख बलस्थान म्हणून ओळखला जातो. दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या इच्छाशक्तीतून कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर अलीकडेच कारखान्याच्या मागील पन्नास वर्षापासून ताब्यात असलेली जमीनही विमानतळासाठी काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे काडादी यांचा ‘ सिद्धेश्वर परिवार ‘ संतप्त झाला आहे. या घडामोडीत सत्ताधारी भाजपविरुद्ध रोष दिसून येतो.

आणखी वाचा-Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?

या पार्श्वभूमीवर गेल्या लोकसभा निवडणुकीत धर्मराज काडादी यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीच्या पाठीशी ताकद उभी केली होती. त्यानंतर आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मागील दहा वर्षे भाजपच्या ताब्यात असलेली सोलापूर दक्षिणची स्वतः काडादी यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढविण्याचा आग्रह त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. त्या अनुषंगाने काडादी यांनी समर्थकांच्या बैठकीत निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. नंतर लगेचच त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी काडादी यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी त्यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा मनोदय यापूर्वीच जाहीर केला आहे.

आणखी वाचा-कोल्हापुरातील तिन्ही अपक्ष आमदारांनी महायुतीची डोकेदुखी वाढवली

सोलापूर दक्षिण विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने परस्परविरोधी दावा केला आहे. यात ही जागा काँग्रेसला सुटण्याची जास्त शक्यता असल्याचे सांगितले जाते. जर ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्यास त्या पक्षाच्या चिन्हावर लढण्याची मानसिकता काडादी यांना करावी लागणार आहे. दुसरे असे की, आतापर्यंत काडादी यांचा सार्वजनिक क्षेत्रातील वर्तुळ प्रामुख्याने वीरशैव लिंगायत समाजापुरता सीमित राहिले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभा वाढवायचे झाल्यास सोलापूर दक्षिण मतदार संघातील धनगर, मुस्लीम, मराठा, दलित, कोळी, बंजारा आदी सर्व समाजघटकांशी नाळ जोडावी लागणार आहे. यापूर्वी, नेमक्या याच अभावामुळे दिवंगत नेते आप्पासाहेब काडादी यांना राजकीय फटका सहन करावा लागला होता. लिंगायत समाजातील दुसरे दिवंगत नेते वि. गु. शिवदारे यांनाही याच कारणामुळे राजकीय झळ बसली होती. त्याचे चिंतन काडादी यांना करावे लागणार आहे.

Story img Loader