देवेंद्र फडणवीसच भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ?

महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे टाळले असले तरी देवेंद्र फडणवीस हेच भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, अशाप्रकारे प्रचारमोहिमेची आखणी करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis, BJP CM candidate,
देवेंद्र फडणवीसच भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ? (image credit – Devendra Fadnavis/fb/file pic)

मुंबई : महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे टाळले असले तरी देवेंद्र फडणवीस हेच भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, अशाप्रकारे प्रचारमोहिमेची आखणी करण्यात आली आहे. प्रसिद्धीमाध्यमे आणि समाजमाध्यमांमधील जाहिराती व प्रचाराच्या ध्वनिचित्रफीतींची गुंफणी त्याच धर्तीवर करण्यात आली आहे.

महायुतीला बहुमत मिळाल्यास आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी एकनाथ शिंदेंची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेना फोडल्याची बक्षिसी म्हणून भाजपने त्यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. पण आता मात्र भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, यादृष्टीने भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रणनीती व तयारी करीत आहे. त्यामुळेच भाजप किमान १५५ हून अधिक जागा लढविण्यावर ठाम आहे. तुम्हाला मुख्यमंत्रीपद देवून भाजप नेत्यांनी त्याग केला, आता तुम्ही अधिक जागांचा आग्रह धरू नये, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे यांना जागावाटपाच्या चर्चेच्या वेळी केल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेपेक्षा (शिंदे गट) किमान दुप्पटीहून अधिक भाजपच्या जागा निवडून येतील, अशी रणनीती आहे. त्यामुळे महायुतीचे बहुमत आल्यास किंवा अपक्ष व छोट्या पक्षांच्या मदतीने सत्तास्थापनेची संधी आल्यास मुख्यमंत्री भाजपचाच असणार आहे.

हेही वाचा – महाविकास आघाडीत जळगाववरून तिढा! शरद पवार आग्रही; चारदा पराभव, तरीही काँग्रेस हट्ट सोडेना

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : अहमदपूरच्या राजकारणाला नवे वळण

भाजपमध्ये फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे एकमेव दावेदार असले तरी पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांना सहजासहजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच शहा यांनी दोन वेळा ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत राज्यात एका व्यक्तीच्या मर्जीने निर्णय न घेता सामूहिक नेतृत्व असावे, अशी सूचना केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रत्येक वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा किंवा नेतृत्व पुढे करून निवडणूक जिंकली. गेल्या विधानसभा निवडणुकीतही फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा करण्यात आली होती. यावेळी मात्र भाजपने फडणवीस यांंची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करणे टाळले आहे, मात्र तेच मुख्यमंत्री होतील, असे ध्वनित करणारी प्रचारमोहीम राबविण्यात येत आहे. फडणवीस यांनी त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि अडीच वर्षे राज्यकारभाराचा गाडा हाकला. त्यामुळे त्यांच्याबद्दल कार्यकर्ते व जनतेमध्येही काही प्रमाणात सहानुभूती आहे. मराठा समाजात मात्र त्यांच्याबद्दल राग व संताप पसरविण्यात आला आहे. तरीही फडणवीस यांना डावलून निवडणूक जिंकता येणार नाही, याचा धडा लोकसभा निवडणुकीच्या निकालातून घेत पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांना निवडणुकीसंदर्भातील निर्णयाचे सर्वाधिकार दिले. त्यामुळे त्यांची मेहनत, सरकारची कामगिरी डावलून सत्ता आल्यावर ऐनवेळी केंद्रीय पातळीवरील एखाद्या नेत्याला पक्षश्रेष्ठींकडून राज्यात पाठविले जाणार नाही किंवा अन्य राज्यात केलेल्या प्रयोगाप्रमाणे एखाद्या तरुण व नवख्या नेत्याला जबाबदारी दिली जाणार नाही, असे ज्येष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळेच फडणवीस यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी जनतेपुढे ठेवून प्रचारमोहीम सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is devendra fadnavis the face of bjp cm candidate for maharashtra assembly election 2024 print politics news ssb

First published on: 16-10-2024 at 12:37 IST
Show comments