संतोष प्रधान
राजस्थान मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते राजेंद्रसिंह गुढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने शिंदे यांच्या शिवसेनेचा राज्याबाहेर विस्तार होऊ लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुढा हे राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. मणिपूरमध्ये महिलांच्या विरोधातील हिंसाचाराची तुलना राजस्थानमधील महिलांवरील अत्याचाराशी केल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी गुढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर गुढा यांनी आपल्याकडे असलेल्या ‘रेड डायरी’त बरीच आक्षेपार्ह माहिती असल्याचा दावा केला होता.

आणखी वाचा-चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर जन सेवा पक्ष, भाजपाकडून निषेध; काँग्रेसची मात्र सावध भूमिका

गुढा यांनी शनिवारी शिवसेनेत प्र‌वेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी मुख्यमंत्री शिंदे हे राजस्थानमधील त्यांच्या मतदारसंघात खास उपस्थित होते. या वेळी माजी मंत्र्याचे पक्षात स्वागत करताना शिंदे यांनी गुढा काय खोटे बोलले, असा सवाल केला. राजस्थानमधील कायदा व सुव्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

शिवसेनेत फूट पडल्यावर शिंदे यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या विविध राज्यांतील नेत्यांचा मेळावा आयोजित केला होता. देशभरातील नेत्यांचा उद्धव ठाकरे यांना नव्हे तर आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. राजस्थानमधील माजी मंत्र्यानंतर आणखी काही राज्यांमधील विविध नेते शिवसेनेत सामील होतील, असे शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is eknath shindes shiv sena expansion across the country print politics news mrj