दिगंबर शिंदे
सांगली : वाळवा आणि शिराळा या दोन तालुक्याचा समावेश असणार्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांनाच राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी अशी मागणी मुंबईच्या बैठकीत करण्यात आली. लोकसभेसाठी इंडियाचे उमेदवार म्हणून प्रतिक पाटील यांना संधी मिळाली तर या मतदार संघात तुल्यबळ तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने राज्यातील लक्ष्यवेधी लढत ठरण्याची चिन्हे आताच दिसत आहेत.
या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे धैर्यशील माने हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे आहेत. एनडीएमध्ये जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू झालेली नसली तरी भाजपची या मतदार संघात तयारी मात्र सुरू आहे. भाजपच्या तयारीची जबाबदारी शिराळ्याचे सत्यजित देशमुख यांच्यावर लोकसभा प्रचार प्रमुख म्हणून सोपविण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार जयंत पाटील यांचा गड म्हणून ओळखल्या जाणार्या इस्लामपूरात सुकाणू समितीची व वॉरियर्स यांची बैठक घेउन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत असताना जनतेशी थेट संवाद साधत विधानसभा निवडणुकीची बीजपेरणीही केली आहे. यामुळे भाजपचे या मतदार संघावर लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीमध्येही चांगलेच लक्ष राहणार हे स्पष्ट आहे.
आणखी वाचा-मंत्री दादा भुसे विरोधकांकडून लक्ष्य, मित्रपक्षांच्या मदतीपासून दूर
इंडियातील राष्ट्रवादीकडून प्रतिक पाटील यांच्यासाठी उमेदवारीची मागणी पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. अद्याप इंडिया आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चाच झालेली नाही. विद्यमान खासदार माने यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर खासदारकी मिळवली होती. आता इंडिया आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचाही या जागेवर दावा राहणार आहे. तरीही आमदार पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीचाही दावा या ठिकाणी प्रबळ असणार आहे. यापुर्वी निवेदिता माने यांच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादीकडेच होती. यामुळे राष्ट्रवादीही या जागेसाठी आग्रही राहणार यात शंका नाही.
हातकणंगले मतदार संघ वारणा, कृष्णा आणि पंचगंगा या तीन नद्यामुळे उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी संघटनेच्या माध्यमातून कधी स्वतंत्रपणे तर कधी भाजपशी सोबत करून या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. गत निवडणुकीत शेट्टी यांनी राष्ट्रवादीशी केलेली आघाडी मतदारांनी नाकारत माने यांना लोकसभेसाठी संधी दिली. यामुळे आता शेट्टी यांचा एकला चलोचा नारा सध्या सुरू आहे. त्यांच्यासाठी इंडिया आणि एनडीए दोन्ही समान अंतरावर आहेत. दोघांशीही आघाडी करण्याची सध्या तरी त्यांची मानसिकता दिसत नाही. मात्र, यामुळे एनडीएने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करीत असताना माने यांना प्राधान्य द्यायचे की इचलकरंजीतील आमदार पुत्र राहूल आवाडे यांना उमेदवारी द्यायची हे अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. राजू शेट्टी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. आणि इंडिया आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून प्रतिक पाटील मैदानात उतरले तर ही तिरंगी लढत अटळ आहे.
आणखी वाचा-अजून एका प्रादेशिक पक्षाची वाटचाल फुटीकडे
आमदार जयंत पाटील यांनी राजकीय वारसदार म्हणून चिरंजीव प्रतिक पाटील यांना पुढे केले आहेच. प्रारंभीच्या काळात त्यांना राजारामबापू कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. खासदारकीसाठी त्यांच्या नावाची गेली दोन वर्षे चर्चा सुरू आहे. गेल्या दोन वर्षापासून सांगलीच्या जागेसाठीही आमदार पुत्रांचे नाव पुढे रेटण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, काँग्रेसने सांगलीच्या जागेवर प्रबळ दावा केल्याने हा विषय मागे पडला. आता हातकणंगलेसाठी नाव पुढे करण्यात आले आहे. यावर आमदार पाटील यांनी अद्याप सोयीस्कर मौन पाळले असून गहू तेव्हा पोळया अशी त्यांची सध्याची भूमिका असली तरी या निमित्ताने चर्चा घडवून आणण्यात अर्धी लढाई मारली आहे असेच म्हणावे लागेल.