सोलापूर : गेले वर्ष-सहा महिन्यांत महाराष्ट्रात पाय रोवणाऱ्या तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने बहुभाषक सोलापूरकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यातून तेलुगुभाषक नेते व कार्यकर्त्यांसह पंढरपूरसारख्या भागातील भगिरथ भालके व अन्य नेते या पक्षात सहभागी झाले आहेत. बीआरएस पक्षाचे नेते, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यासह तेथील अर्थमंत्री टी. हरीश राव, गृहमंत्री मेहमूद, केसीआर यांच्या कन्या आमदार के. कविता व इतरांचे झालेल्या दौ-यातून सोलापूरकरांचे कुतुहल आणखी वाढले आहे. यातून अलिकडे बीआरएसच्या विस्ताराचा विचार करताना हा पक्ष तेलुगु भाषकांच्या वर्तुळातच सीमित होतो की काय, अशी शंका स्थानिक राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोलापुरातील तेलुगुभाषकांचा आणि काही प्रमाणात मुस्लीम समाजाचा तेलंगणाशी सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, व्यापार, उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने तेलंगणाशी पिढ्यान् पिढ्या संबंध आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी बीआरएस पक्षाचा सोलापुरात विस्तार करताना याच अनुकूल परिस्थितीचा विचार करणे स्वाभाविक होते. विशेषतः तेलुगु भाषकांशी सांधा जोडताना केसीआर यांनी येथील काँग्रेस, भाजप आदी पक्षातील दुर्लक्षित, अडगळीत पडलेल्या आणि नवीन राजकीय पोकळी भरून काढू शकणाऱ्या नेत्यांशी संधान बांधले. यात प्रथम काँग्रेसचे वयोवृध्द माजी खासदार धर्मण्णा सादूल हे बीआरएसच्या हाती लागले. त्यानंतर पंढरपूरचे दिवंगत साखर सम्राट, राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांनीही केसीआर यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे बीआरएस पक्षाविषयी सार्वत्रिक उत्सुकता वाढणे साहजिक होते.

हेही वाचा : ओबीसी संघटनाही करणार न्यायालयीन संघर्ष

त्यानंतर अलिकडे भाजपचे दिवंगत माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, १०० वर्षांच्या जुन्या पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप आदींनी बीआरएसचा झेंडा हाती घेतला. त्यापाठोपाठ दक्षिण सोलापूर तालुक्यातील सचिन सोनटक्के यांनी काही गावांच्या आजी-माजी सरापंचांसोबत हैदराबाद वारी करून बीआरएस पक्षात प्रवेश घेतला. मात्र इकडे सर्वप्रथम पक्षात गेलेले माजी खासदार धर्मण्णा सादूल हे बाजूला पडले. सध्या ते पक्षात सक्रिय नाहीत. उलट, पक्षाच्या बांधणीबाबत आपला भ्रमनिरास झाल्याचे सादूल सांगतात.

पंढरपुरात आषाढी यात्रेचे कारण पुढे करून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पक्षाचे आमदार, खासदार व पदाधिका-यांना सोबत घेऊन हैदराबादहून सुमारे सहाशे वाहनांचा मोठा ताफा सोलापूरमार्गे पंढरपूरला नेला होता. त्यांनी सोलापुरात काही तेलुगुभाषक नेत्यांच्या घरी भेट देऊन चाचपणी केली होती. त्यानंतर गेल्या राखी पौर्णिमेला पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय ऋषीच्या रथोत्सवाचे निमित्त साधून तेलंगणाचे अर्थमंत्री टी. हरीश राव आणि गृहमंत्री मेहमूद, त्यानंतर अलिकडे नवरात्रौत्सवात तेलुगुभाषकांच्या ब्रतुकम्मा उत्सवात सहभगी होण्यासाठी केसीआर कन्या, आमदार के. कविता यांचीही हजेरी लागली. या भेटी प्रामुख्याने शहरातील तेलुगुभाषकांशी निगडीत होत्या. अपवाद गृहमंत्री मेहमूद यांचा होता. त्यांनी स्थानिक मुस्लीम समाजाला आकृष्ट करण्याच्या हेतूने नई जिंदगी, पाच्छा पेठ, बेगम पेठ आदी मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये फिरले. त्यावेळी भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला ; एवढेच. मात्र तिकडे पंढरपूर, दक्षिण सोलापूर व अन्य भागात पक्षाचा एकही नेता तेथील मराठी व कन्नड भाषक नेते, कार्यकर्त्यांकडे फिरकला नसल्याचे दिसून आले. केसीआरकन्या आमदार के. कविता आल्या असता त्यांच्या भेटीसाठी पंढरपूरहून आलेले भगिरथ भालके यांना केसीआराकन्येकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा : बारामतीच्या रंगीत तालमीत अजित पवारांची सरशी

सर्वात महत्वाचे म्हणजे सोलापुरात बीआरएसने हळूहळू पाय रोवायला सुरूवात केल्यानंतर स्थानिक प्रश्नांवर पक्षाचा कृती कार्यक्रम वा पक्ष बांधणी अद्यापि गुलदस्त्यातच आहे. अशीच परिस्थिती आणखी पुढे राहिल्यास या पक्षाबाबत भ्रमनिरास होण्यास उशीर लागणार नाहो,असे पक्षात प्रवेश केलेल्यांना आणि प्रवेशोच्छुकांना वाटते. पक्षाचा कार्यविस्तार सोलापुरात करताना केवळ तेलुगुभाषकांपुरता सीमित असल्याचे जाणवते. किंबहुना सोलापूरपुरते बोलायचे म्हटल्यास बीआरएस पक्ष शहराच्या एका विशिष्ट भागापुरता मर्यादित ठरला आहे.

तीन-चार महिन्यांपूर्वी सोलापूर भागात बीआरएसने गाड्याघोड्या फिरवत खूप गाजावाजा केला. त्याला आकर्षित होऊन काही कार्यकर्त्यांनी गुलाबी उपरणं घालून पक्ष प्रवेश केला. मात्र आता आठ महिन्यापूर्वी नेमणुका झालेल्या पदाधिकाऱ्यांना दूर ठेवले गेले आहे. केवळ तेलगू समाजापुरते मर्यादित असणाऱ्या नेत्यांची ठराविक वर्तुळात वावरण्याची कुवत असल्यामुळे आतापर्यंत बीआरएसच्या कक्षा रूंदावल्या नाहीत. विशेषत: मुस्लिम समाज व शहराच्या इतर भागातील कार्यकर्त्यांचा लोच्या झाला आहे. काही अपवाद वगळता बीआरएसमध्ये विद्यमान नेत्यांच्या देहबोली आणि आक्षेपार्ह वागणुकीमुळे बीआरएसला तळमळीचे, हाडाचे कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. त्यामुळे नवीन कार्यकर्ते मिळणे दुरापास्त झाले आहे. स्थानिक मराठी भाषिकांच्या मनात काय चाललंय हे हैदराबादमधील पक्षश्रेष्ठींना जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत बीआरएसने राबविलेल्या प्रत्येक मोहिमेला यश मिळण्याची शाश्वती नाही. .कारण स्थानिक पातळीवरील नेतृत्वाकडे सर्वसमावेशकतेचा अभाव दिसून येतो.

हेही वाचा : कर्नाटकमध्ये विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्तच, भाजपाच्या केंद्रीय नेत्यांच्या मनात नेमके काय?

तेलंगणात राबविण्यात आलेल्या योजना, प्रकल्प विशेषतः ग्रामीण शेतकरी, कामगारांसह महिला, दलित, आदिवासींसाठी कल्याणकारी योजनांकडून महाराष्ट्रातील जनतेला आकृष्ट करायचे झाल्यास बीआरएसची बांधणी तेवढ्याच ताकदीने होणृ अपेक्षित आहे. व्यापक दृष्टिकोन ठेवून ठराविक वर्तुळात न वावरता जास्तीत जास्त कार्यकर्त्यांशी थेट संवाद व संपर्कात राहिल्यास फरक पडेल. त्यादृष्टीने भगिरथ भालके यांच्यासारख्या युवा नेत्याच्या ताकदीचा वापर करून घेणे आवश्यक असल्याचे राजकीय जाणकरांना वाटते. सध्या पक्षाची कार्यकारिणीही अस्तित्वात नाही. स्वतंत्र कार्यालयही नाही. पक्षाची हीच स्थिती राहणार असेल तर इतर पक्ष जसे जनतेला आकृष्ट करण्यासाठी गाजर दाखवितात, तसेच गाजर बीआरएसकडूनही दाखविले जात असल्याचा समज फैलावेल आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि अन्य पक्षातून बीआरएसमध्ये आलेल्या छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्यांची पुन्हा घर वापसी होईल किंवा अन्य पक्षात प्रवेश करण्याचा मार्ग खुला राहील, अशी कुजबूज आता पक्षातच सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is k chandrashekhar rao s bharat rashtra samiti party limited to telugu peoples of solapur print politics news css