नांदेड : गेल्या दोन दशकांतील नांदेड जिल्ह्याच्‍या राजकारणात अशोक चव्‍हाण यांच्‍यानंतरचे ठळक नाव म्‍हणजे प्रताप पाटील चिखलीकर. भाजपाने त्‍यांची उमेदवारी नुकतीच जाहीर केली आहे. २०१९ च्‍या लोकसभा निवडणुकीत चव्‍हाण यांच्‍यासारख्या मातब्‍बर उमेदवाराविरुद्ध भाजपाने चिखलीकर यांना अनपेक्षितपणे उभे केले आणि त्‍यावेळी झालेल्या अटीतटीच्‍या लढतीत त्‍यांनी आपले नाव सार्थक केले. अशोक चव्हाण यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने यंदा चिखलीकर यांच्यासाठी निवडणूक सोपी जाईल, असे मानले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शंकरराव आणि चव्‍हाण कुटुंबाच्‍या माध्यमातून राजकारणात दाखल झालेले प्रताप पाटील काँग्रेसमध्ये असताना स्‍थानिक राजकारणात चव्‍हाण समर्थक म्‍हणूनच ओळखले गेले; पण आमदार होण्यासाठी त्‍यांना २००४ साली स्‍वतःचा स्‍वतंत्र मार्ग शोधावा लागला. तेथून पुढे अशोक चव्‍हाण व चिखलीकर यांच्‍यात आधी दुरावा आणि नंतर राजकीय शत्रुत्‍व निर्माण झाले. अर्थात त्‍या पुढच्‍या राजकारणात हे शत्रुत्‍वच त्‍यांना लाभदायी ठरत गेले.

हेही वाचा : रावसाहेब दानवे यांच्यासमोर यंदा आव्हान ?

काँग्रेससह इतर पक्षांमध्ये संचार करताना चिखलीकर यांना महाराष्ट्रातील काही दिग्‍गज नेत्‍यांची कार्यशैली जवळून पाहायला मिळाली, त्‍यातून त्‍यांनी आपली स्‍वतंत्र कार्यशैली निर्माण केली. सरपंच ते लोकसभा खासदार या राजकीय प्रवासात त्‍यांनी इतर लोकसंग्राहक नेत्‍यांप्रमाणेच आपला लोकसंग्रह निर्माण केला. आमदारकी आणि खासदारकी दरम्‍यान राजकीय कार्याला विधायक, सामाजिक आणि सांस्‍कृतिक उपक्रमांची जोड देत राजकारणाच्‍या मुख्य प्रवाहात राहण्याची दक्षता ते घेत आले आहेत.

चिखलीकरांचे वास्‍तव्‍य नांदेड शहरात, त्‍यांचे मित्रमंडळ खूप मोठे; पण त्‍यांचा लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात येत नसतानाही २०१९ साली ते नांदेडमध्ये उभे राहिले. प्रतिस्‍पर्धी अशोक चव्‍हाण यांनी पहिल्या टप्‍प्‍यातच चिखलीकरांना ‘चिल्लर’ असे संबोधले होते; पण नंतर चव्‍हाणांच्‍या धनशक्‍तीपुढे शेवटी चिल्लरच भारी ठरली. चव्‍हाणांना पराभूत केल्यानंतर भाजपात नरेंद्र मोदींसह अनेक नेत्‍यांना त्‍यांचे कौतुक वाटले, तरी इंग्रजी व हिंदी भाषांवरील प्रभुत्‍वाअभावी इतर अनेक खासदारांप्रमाणे चिखलीकर लोकसभेमध्ये प्रभाव पाडू शकले नाहीत.

हेही वाचा : नगरमधील सारे विखे-पाटील विरोधक लंके यांच्या पाठीशी ?

खासदारकीच्‍या पाच वर्षांतील त्‍यांचे प्रगतिपुस्‍तक हुशार विद्यार्थ्याला साजेसे नाही; पण राज्‍य आणि केंद्रीय पातळीवरील नेते, वेगवेगळ्या खात्‍यांचे मैत्री यांच्‍याशी संवाद-संपर्क वाढवून त्‍यांनी रेल्वेचे काही प्रकल्प आणि वेगवेगळ्या मागण्या मार्गी लावल्या. नितीन गडकरी, फडणवीस यांच्‍या माध्यमातून विविध कामांसाठी जिल्ह्यात निधी आणला. लोकांच्‍या सार्वजनिक-व्‍यक्‍तिगत प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबतीत नेहमीच तत्‍परता दाखवली.

हेही वाचा : Electoral Bonds Data: निवडणूक रोख्यांमधून हजारो कोटी दान करणारे ‘दानशूर’ कोण आहेत माहितीये? वाचा पहिल्या २० दात्यांची माहिती!

अशोक चव्‍हाण यांच्‍यानंतर जिल्ह्यात आपणच क्रमांक दोनचे नेते आहोत, हे चिखलीकरांनी मागील काही वर्षांत कार्य-कृतीतून सिद्ध केले. पण त्‍यांच्‍या कार्यशैलीमुळे भाजपातला एक मोठा गट त्‍यांच्‍या विरोधात गेला. या गटाने यावेळी त्‍यांच्‍या उमेदवारीलाच आव्‍हान दिले होते; पण पहिल्याच यादीमध्ये नाव आणत चिखलीकर यांनी आपले नाव ‘सार्थक’ केले. २०१९ साली चिखलीकरांच्‍या ‘प्रतापा’चा तडाखा अशोक चव्‍हाण यांना बसला होता. आता लोकसभेसाठी चिखलीकरांविरुद्ध काँग्रेसकडून वसंतराव म्‍हणजे दुसरे चव्‍हाण रिंगणात उतरण्याच्‍या तयारीत आहेत. हे चव्‍हाण जिल्ह्यातील नायगावचे भूमिपुत्र आहेत तर चिखलीकर हे नायगाव तालुक्‍याचे जावई आहेत. यंदाची लढत भूमिपुत्र विरुद्ध जावई अशी राहील.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is nanded lok sabha election easy to win for bjp s pratap patil chikhalikar due to ashok chavan print politics news css