Devendra Fadnavis remarks on Ajit Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये शरद पवारांशी फारकत घेऊन महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या एका जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजित पवारांचे स्वागत करताना म्हटले, “अजितदादा आता योग्य ठिकाणी आले आहेत, पण इथे येण्यास त्यांनी बराच वेळ घेतला.” या विधानाला वर्ष लोटल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल केलेले विधान चर्चेत आहे. इंडिया टुडे वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मते महायुतीकडे वळली नाहीत, त्याचा फटका महायुतीला बसला.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द इंडियन एक्स्प्रेसने महायुतीमधील तिढ्याबाबत एक लेख प्रकाशित केला आहे. ज्यात म्हटले की, अजित पवारांना महायुतीमध्ये घेरले जाण्याची ही पहिली वेळ नाही. दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विवेक साप्ताहिकातही अजित पवारांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. “राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतल्याची बाब भाजपाच्या कार्यकर्त्यांना रुचलेली नाही”, असे विवेकच्या एका लेखात म्हटले गेले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले होते की, संघाच्या मुखपत्रात जे छापून आले, तेच भाजपा किंवा त्यांच्या नेत्याचे मत असेल असे नाही.

हे वाचा >> मुख्यमंत्रीपद ‘फिरते’ हवे? अजित पवार यांची भाजपकडे मागणी

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणात अनेकदा परिस्थितीनुसार काही निर्णय घ्यावे लागतात. राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणे हे पक्षातील १०० टक्के लोकांना पटले नाही, पण ८० टक्के लोकांची समजूत घालण्यात आम्ही यश मिळविले होते. याचा अर्थ भाजपा राष्ट्रवादीशी केलेली युती तोडणार का? असाही प्रश्न या मुलाखतीत फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले की, या विषयात आता माघार घेता येणार नाही; आहे त्या परिस्थितीत पुढे मार्गक्रमण करावे लागणार आहे.

दुसरीकडे अजित पवार मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचाच घटक पक्ष राहणार असल्याचे जोर देऊन सांगत आहेत. लोकसभेला केवळ एकाच जागेवर मिळविलेला विजय, शरद पवार गटाकडून सातत्याने होत असलेला हल्ला आणि त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला महायुतीमधील तिसरे चाक असल्याचे संबोधल्यामुळे अजित पवार यांच्या गटासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या इंडिया टुडे मुलाखतीमधील विधानानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सरकार आणि महायुतीमधील आमचा सहकारी आहे, आम्ही त्यांचा आदर करतो. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही आमच्यातला समन्वय अधिक चांगला केला असून खालच्या पातळीवरही हा समन्वय आणखी सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.”

हे ही वाचा >> Amit Shah: अमित शाह यांचा बैठकांचा सपाटा; देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व, गडकरींची अनुपस्थिती, मराठा आंदोलनाच्या प्रश्नांवर काय म्हणाले?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कॅबिनेट मंत्र्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले की, लोकसभा निवडणुकीत भाजपानेही आमच्या उमेदवाराचा प्रचार केला नाही. समन्वयाचा अभाव जाणवत असल्याची बाब त्यांच्याही नेत्यांनी निवडणुकीनंतर मान्य केली होती. मात्र, समन्वयाचा अभाव आता आणखी वाढला असल्याचे सांगितले जात आहे. एका बाजूला जागावाटपाची चर्चा आणि दुसऱ्या बाजूला विचारसरणीमध्ये असलेला फरक ठळक होत आहे.

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपा नेत्यांच्या चिथावणीखोर भाषणांवर आक्षेप घेतला होता. तसेच नागपूर येथे झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली असताना अजित पवार यांनी मात्र तिथे जाणे टाळले. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपा आमदार नितेश राणे यांच्या विधानाकडे लक्ष वेधून याचे गंभीर परिणाम महायुतीला भोगावे लागू शकतात, असे सांगितले होते. महंत रामगिरी महाराज यांचे समर्थन करताना नितेश राणे यांनी मशिदीत घुसण्याबद्दल वक्तव्य केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “आमची पुरोगामी भूमिका कायम आहे. आम्ही महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांना मानणारे लोक आहोत. आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांवर तडजोड करणार नाही. भाजपाशी आमची युती ही विकासासाठी आहे.” सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेते हे इतर पर्यायांची चाचपणी करत आहेत. अल्पसंख्याक आणि धर्मनिरपेक्ष मतपेटी शाबूत राहावी यासाठी काही जण अपक्ष निवडणूक लढविण्याच्या विचारात आहेत.

राष्ट्रवादीचा काय फायदा? भाजपामध्ये अंतर्गत चर्चा

काही दिवसांपूर्वीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला पाच हेक्टर जमीन माफक दरात देण्याला अजित पवारांच्या अर्थखात्याने विरोध दर्शविला होता. पाच कोटींची जमीन दीड कोटीत देण्यासाठी विरोध दर्शविला गेला, मात्र नंतर जादा दराने जमीन दिली गेली.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपयुक्ततेबाबत भाजपाच्या नेत्यांमध्ये अंतर्गत चर्चा सुरू झाली आहे. भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, “राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आमचा पाया मजबूत होण्यासाठी लाभ होईल, अशी शक्यता वाटत होती. पण, लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून तसे दिसले नाही. या युतीचा फायदा ना भाजपाला झाला, ना राष्ट्रवादीला.” तसेच या नेत्याने सांगितले की, जर अजित पवार यांना महायुतीत अधिक डावलले गेले तर ते पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर ते आणखी धोकादायक होईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is ncp the unwanted third wheel in mahayuti devendra fadnavis remarks add to tension kvg
Show comments