कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्यास चार दिवस उरले आहेत. आत्तापर्यंत काँग्रेससाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांनी संयमित प्रचार केला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी कुटुंबाविरोधात आक्रमक झाल्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मोदी विरुद्ध गांधी कुटुंब असा सामना रंगण्याची शक्यता दिसू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेससाठी कर्नाटकात पोषक वातावरण असल्याचे चित्र ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये जाणवले होते. त्यामुळे राहुल व प्रियंका दोघेही कर्नाटकमध्ये केंद्रीभूत प्रचार करतील असे काँग्रेसने स्पष्ट केले. मात्र, प्रदेश काँग्रेसमध्ये दोघांच्याही प्रचाराबद्दल शंका होती. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसाठी राज्यातील प्रश्नांवर प्रचार करणे अपेक्षित होते. राहुल गांधींनी मोदी वा अदानी वगैरे राष्ट्रीय मुद्दे प्रचारामध्ये आणले तर हातातून वाळू निसटून जावी तसे बोम्मई सरकारविरोधातील मुद्दे विरून जाण्याची भीती प्रदेश काँग्रेस नेत्यांना वाटत होती. राहुल व प्रियंका या दोघांनीही संयत प्रचार करून प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या मनातील धाकधुक कमी केली. राहुल गांधींनी बोम्मई सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांभोवती प्रचार मर्यादित ठेवला. अदानींच्या गैरव्यवहारांवर बोलण्याचे टाळले. मोदींवरही त्यांनी पूर्वीप्रमाणे तीव्र टीका केली नाही.

हेही वाचा – Karnataka Election 2023 : “नरेंद्र मोदींचे सहकारी भ्रष्टाचारात गुंतलेले, भाजपाकडून मागितले जाते ४० टक्के कमिशन,” मल्लिकार्जुन खरगे यांचा गंभीर आरोप

राहुल गांधींनी दाखवलेला संयम पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी न दाखवल्यामुळे मोदींना काँग्रेसवर टीका करण्याची संधी मिळवून दिली. काँग्रेसने ९१ वेळा माझ्याविरोधात अभद्र भाषा वापरून मला त्रास दिला गेल्याचा आरोप मोदींनी केला. मोदींचा अभद्र भाषेचा रोख प्रामुख्याने गांधी कुटुंबाविरोधात असल्याचे दिसते. ‘मौत का सौदागर’, चौकीदार चोर है अशा अनेक मोदीविरोधी घोषणा दिल्या गेल्या. त्याची आठवण मोदींनी भाषणांमधून करून दिली. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणताना मोदींनी गांधी कुटुंबाचा उल्लेख ‘शाही कुटुंब’ असा केला. काँग्रेसला शाही कुटुंबासाठी कर्नाटक नंबर-१ एटीएम राज्य बनवायचे आहे, अशी टीका मोदींनी केली. मोदींच्या या टिकेमुळे राहुल व प्रियंका यांनाही मोदींना प्रत्युत्तर द्यावे लागले आहे.

मोदींच्या आरोपावर, ‘शिवीगाळ करून मला त्रास दिला असे म्हणणारे मी पहिलेच पंतप्रधान बघितले. पंतप्रधानांनी (मोदींनी) लोकांच्या समस्यांची यादी वाचून न दाखवता त्यांच्या विरोधात किती वेळा अभ्रद्र भाषेचा वापर केला हे सांगितले. शिव्याच काय मी देशासाठी छातीवर गोळी झेलायलाही तयार आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. मोदीजी, तुम्ही माझ्या भावाकडून काहीतरी शिका’, असे प्रत्युत्तर प्रियंका गांधी यांनी दिले. ‘माझ्या कुटुंबाविरोधात भाजपने किती वेळा अभद्र भाषेचा वापर केला, वैयक्तिक निंदानालस्ती केली हे मी मोजायचे ठरवले तर मला एक नव्हे तर अनेक पुस्तके लिहावी लागतील’, अशी टीकाही प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली.

हेही वाचा – कर्नाटकच्या निवडणुकीत बजरंग दल केंद्रस्थानी! हिंदुत्त्ववादी संघटनेला एवढे महत्त्व का?

‘९१ वेळा हल्लाबोल झाल्याची तक्रार मोदींनी केली असली तरी, ही निवडणूक मोदींसाठी नव्हे तर, युवा, महिला, कामगार, शेतकऱ्यांसाठी आहे. पण, भाजप आणि मोदी त्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. मोदी भाषणांमधून ७० टक्के स्वतःबद्दल बोलतात, ३० टक्के राज्याबद्दल बोलतात. स्वतःबद्दल बोलायला तुम्हाला आवडते तर बोला, विरोधकांबद्दल तक्रार करा. पण, उर्वरित ३० टक्क्यांमध्ये महागाईबद्दल बोला, राज्यासाठी तुम्ही काय करणार हेही सांगा’, अशी थेट टीका राहुल गांधींनी मोदींवर केली.

आत्तापर्यंत राहुल-प्रियंका यांनी मोदींना वगळून कर्नाटकच्या मुद्द्यांच्या आधारे प्रचार केला होता. मात्र मोदींनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केल्यामुळे राहुल-प्रियंका यांनाही मोदींवर टीका करावी लागली आहे. मोदींवरील टीका-टिप्पणी भाजपसाठी लाभदायी ठरण्याची शक्यता असू शकते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is pm modi vs gandhi family in the final stages of karnataka election campaign in print politics news ssb